बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्‍या डॉक्टरवर गुन्हा   

राजगुरुनगर : (वार्ताहर) : बेदरकारपणे वाहन चालवून तीन मजूर व तीन दुचाकींना धडक देऊन अपघात करणार्‍या बेधुंद वाहनचालक डॉक्टरवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराजवळील सातकरस्थळ येथे मंगळवारी घडलेल्या अपघातप्रकरणी कोणाचीही तक्रार नाही, म्हणून पोलीसांनी दुर्लक्ष केलेल्या या घटनेत प्रत्यक्षात एका मजूराच्या पायांचा चेंदामेंदा झाला आहे. तर इतर जखमी झाले आहेत. भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर पोलीसांनी फिर्यादी होऊन त्यानंतर तीन दिवसांनी हा गुन्हा दाखल झाला. डॉ. सारंग पांडुरंग होले असे मोटारचालकाचे नाव आहे. 
 
वाडा बाजूकडून राजगुरुनगर शहराकडे येणार्‍या भरधाव मोटारीने वाडा बाजूकडे जाणार्‍या दुचाकींना समोरून धडक दिली. व मोटार बाजूच्या ओढ्यात जाऊन पडली. या अपघातात शिवाजी विठ्ठल साबळे (वय ३४, सध्या रा. सणसवाडी, ता. शिरूर), दत्तात्रय मनोहर सुभेदार (मूळ रा. नांदेड) यांना दुखापत झाली. तसेच रुपेशकुमार चौहाण (वय २०), राम बाबुराम व सोजित राम (वय २८, सध्या सर्व रा. चास, ता. खेड) यांना दुखापत झाली. अपघातानंतर मोटारचालक डॉक्टर मोटार सोडून पळून गेला. तसेच तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. गाडीच्या दोन्ही नंबरप्लेट काढून नेल्या होत्या. त्यामुळे डॉ. सारंग पांडुरंग होले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. अपघातात तिघा जणांचे पाय मोडल्याने ते जायबंदी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles