आमदार बसनगौडा यांची हकालपट्टी   

बंगळुरू : सोन्याचा चोरटा व्यापार करणारी अभिनेत्री रान्या राव विषयी  वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे कर्नाटकमधील आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांची पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.भाजपच्या केंद्रीय शिस्त समितीचे सचिव ओम पाठक यांनी हा अधिकृत आदेश जारी केला आहे. या प्रकरणात यत्नाळ यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. त्यावर त्यांचे उत्तर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यत्नाळ हे विजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पक्षाच्या कारवाईवर बसनगौडा पाटील यत्नाळ यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.       
 
डिसेंबर २०२३ मध्येच यत्नाळ यांनी मला पक्षातून काढून टाकले तर मी कोरोनामधील घोटाळे उघड करेन, अशी धमकी पक्षाला दिली होती. दरम्यान, यत्नाळ यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. यत्नाळ आता स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू करणार की दुसर्‍या पक्षात प्रवेश करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 
 

Related Articles