‘फिरकी’ने पटकावला पहिला लोकमान्य करंडक   

‘लोकमान्य करंडक’ नाट्यवाचन स्पर्धेचा उत्साहात समारोप
 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ‘लोकमान्य टिळक नाट्यवाचन स्पर्धा उत्साहात पार पडली.
 
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात डॉ. गीताली टिळक, डॉ. सुवर्णा साठे, अजित खाडीलकर उपस्थित होते.
 
पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या हॉटेल मॅनेजमेंट व आर्ट सर्कलच्या वतीने आयोजित ‘लोकमान्य टिळक नाट्यवाचन स्पर्धेत नाट्यहर्ष पुणेने सादर केलेल्या ‘फिरकी’ या एकांकिकेने पहिला क्रमांक पटकावला. कलाकंड या संस्थेने सादर केलेल्या ‘कवटीतील कैदी’ या एकांकिकेने द्वितीय, तर कलाकार मंडळीने सादर केलेल्या ‘इन्फेक्शन’ एकांकिकेने तृतीय क्रमांकावर नाव कोरले.
 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सभागृहात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 15 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते झाले. टिमविच्या प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे, टिमवि ट्रस्टचे सचिव अजित खाडीलकर यावेळी उपस्थित होत्या. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण विद्यापीठाच्या स्थापना दिनी म्हणजेच 6 मे 2025 रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहे.
 
डॉ. सुवर्णा साठे म्हणाल्या, भारतीय कलेला मोठा इतिहास आहे. त्यामुळे कलेचे जनत झाले पाहिजे. कलेचे संवर्धन ही काळाची गरज आहे. विविध प्रकारच्या व्यासपीठावरून कलेची जोपासणा झाली पाहिजे. स्पर्धेचे परीक्षक माधव जोगळेकर म्हणाले, नाट्य वाचन स्पर्धेसाठी सहभागी सर्वच स्पर्धकांनी मेहनत केली आहे. मात्र स्पर्धेसाठी नुसती मेहनत करून चालत नाही. तर भाषेचा अभ्यास आणि शब्दांचा उच्चार स्पष्ट आणि शुद्ध असला पाहिजे. तसेच योग्य व्याकरणाचा वापर केल्याने संवाद अधिक परिणामकारक होतो. नाट्यवाचन ही केवळ वाचनावर आधारित कला असल्यामुळे शब्दांवर योग्य जोर देणे महत्त्वाचे आहे.
 
स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध रंगकर्मी माधव जोगळेकर व मंदार कुलकर्णी यांनी केले. डॉ. महेश रांधवे यांनी प्रास्ताविक केले. इश्मित कौर, रिया चव्हाण, अथर्व लोहोगांवकर यांनी स्पर्धेचे निवेदन केले. डॉ. अमित खरे यांनी अभार मानले.
 
वैयक्तिक पारितोषिके  
 
• सर्वोत्कृष्ट लेखन-राहुल काळे (ती-मॉर्डन कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स)
• दिग्दर्शन -प्रथम-रोशन काकडे (व्हॅलेनटाईन डे-मेगो एंटरटेन्मेंट)
• द्वितीय - डॉ. रिद्धी कुलकर्णी (फिरकी-नाट्यहर्ष पुणे.)
• तृतीय - परितोषक ठाकर (इन्फेक्शन-कलाकार मंडळी, पुणे.)
• उत्तेजनार्थ-सरिता अनिरुद्ध (वीज म्हणाली धरतीला-क्रिएशन थिएटर)
• वाचिक अभिनय स्त्री-प्रथम-डॉ. रिद्धी कुलकर्णी (सून-फीरकी- नाट्यहर्ष पुणे.)
• द्वितीय-युक्ता नाईक (सुमन-इन्फेक्शन-कलाकार मंडळी, पुणे.)
• तृतीय-नीरजा भिडे (सारा-स्टेंटस क्योइंड सर्च टिम 2)
• उत्तेजनार्थ-सविता इंगळे (हीना-विवर-माऊली क्रिएशन)
• वाचिक अभिनय पुरुष-प्रथम-सुरज इप्ते (ऋष्या-व्हॅलेटाईन डे-मेगो एंटरटेन्मेंट)
• द्वितीय-प्रतीक जोशी (हवालदार-फिरकी-नाट्यहर्ष पुणे.)
• तृतीय-संकेत देशपांडे (गणपतराव-कवटीतला कैदी -कलाकंड, पुणे.)
• उत्तेजनार्थ-प्रशांत कुलकर्णी (जयंत-परफेक्ट मिसमॅच-राधिका क्रिएशन)
 
सांघिक पारितोषिके
 
• सांघिक प्रथम ‘लोकमान्य करंडक’ - फिरकी - नाट्यहर्ष पुणे.
• सांघिक द्वितीय - कवटीतला कैदी -कलाकंड, पुणे.
• सांघिक तृतीय - इन्फेक्शन-कलाकार मंडळी, पुणे.
• विशेष लक्षवेधी सादरीकरण -व्हॅलेनटाईन डे- मेगो इंटरटेन्मेंट
 
नाटक हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम
 
नाटक हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. स्वातंत्र्य चळवळीत नाटक, कीर्तन, भजन, मेळ्याच्या माध्यमातून लोकमान्यांनी मोठ्या प्रमाणात लोकजागृती केली होती. लोककलेतून जनजागृती झाल्यामुळे स्वातंत्र्य चळवळीची व्याप्ती वाढण्यास मदत झाली. मनोरंजनातून देशभक्ती हे सुत्र लोकमान्यांनी अवलंबिले होते. आजही नाटक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही, तर समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे.
 
- डॉ. गीताली टिळक, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ 
 

Related Articles