अरम्बाई तेंगोल सदस्यांसोबत झालेल्या चकमकीत चार यूएनएलएफ दहशतवादी जखमी   

इम्फाळ : मणिपूरमध्ये इम्फाळच्या पूर्व जिल्ह्यात मेईतेई कट्टरतावादी संघटनेच्या सदस्यांसोबत झालेल्या चकमकीत ’युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट’ (पामबेई) या प्रतिबंधित संघटनेचे किमान चार अतिरेकी जखमी झाले. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.
 
पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले की, चार जखमी यूएनएलएफ दहशतवाद्यांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली जेव्हा अरम्बाई तेंगोलच्या १५ ते २० सदस्यांनी कोंगपाल चिंगांगबम लेकाई येथील यूएनएलएफ अतिरेकी इरेंगबाम नंदकुमार सिंग (५६) यांच्यासह त्यांच्या संघटनेवर त्यांच्याच घरात घुसून हल्ला केला. घरात उपस्थित असलेले चार यूएनएलएफ (पामबेई) अतिरेक्यांनी लाठीने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले, असे अधिकार्‍याने सांगितले. ते म्हणाले, की दोन्ही बाजूंनी काही गोळ्या झाडल्या गेल्या, त्यानंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर, सुरक्षा दलांनी शनिवारी रात्री जिल्ह्यातील खुराई भागातील अरम्बाई तेंगोल यांच्या कार्यालयावर छापा टाकत तीन वाहने, १५ ग्रॅम हेरॉईन, आठ बुलेटप्रूफ प्लेट्स, तीन वायरलेस हँडसेट आणि इतर वस्तू जप्त केल्या, असे अधिकार्‍याने सांगितले. 
 
प्रक्षोभक  बातम्या पसरविल्याबद्दल गुन्हे
 
• अरम्बाई तेंगोल ही एक कट्टरतावादी मीतेई संघटना आहे. ही कुकी गावातील स्वयंसेवकांसोबतच्या संघर्षात आघाडीवर होती. दरम्यान, कुकी-बहुल चुराचंदपूर जिल्ह्यात व्हॉट्सप ग्रुप्स आणि समाज माध्यमावर पोलिसांनी खोट्या आणि प्रक्षोभक बातम्या पसरवल्याबद्दल सहा गुन्हे नोंदवले आहेत. एका निवेदनात पोलिसांनी खोट्या किंवा प्रक्षोभक बातम्या पसरवण्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles