बस चालवत मोबाईलवर क्रिकेट पाहणार्‍या चालकावर कारवाई   

पुणे : प्रवाशांनी भरलेली बस घेवून निघालेल्या बस चालकाने गाडी चालवत मोबाईलवर क्रिकेचा सामना पाहिल्याची घटना समोर आल्यानंतर एसटी महामंडळाने या चालकावर कारवाई करत त्यास बडतर्फ केले आहे. ही बस आणि चालक खासगी कंपनीचा असल्यामुळे संबंधित कंपनीला ५ हजाराचा दंडही आकारण्यात आला आहे. ही कारवाई परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. 
 
२१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खाजगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळाजवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिकार्‍यांनी संबंधित खाजगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहन चालवल्याप्रकरणी बडतर्फ केले आहे. 
 
ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई-पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बससेवा आहे. या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करीत असतात. अपघातविरहित सेवा हा या बस सेवेचा नावलौकिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार्‍या चालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटीच्या या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास दृढ होत जाईल! तसेच भविष्यात एसटीकडे असलेल्या खाजगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. 
 
रिक्षा, टॅक्सी चालकांवरही होणार कारवाई
 
खाजगी अथवा प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षा, टॅक्सीचे चालक देखील कानात हेडफोन घालून गाडी चालवत मोबाईलवर मॅच अथवा चित्रपट पाहत असल्याच्या तक्रारी प्रवासी वर्गाकडून परिवहन विगाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी संदर्भात लवकरच परिवहन विभागाकडून नवीन नियमावली निश्चित करून अशा चालकांवर निर्बंध आणले जाणार असल्याचेही परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Related Articles