युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले   

किव्ह : युद्धबंदीसाठी अमेरिकेसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनी सांगितले असताना रशियाने युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर पुन्हा हल्ले केले आहेत. रात्रभर हल्ले सुरू होते, असे शुक्रवारी युक्रेनच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 
 
युक्रेनच्या पायाभूत वीज प्रकल्पांंना रशियाने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करून लक्ष्य केले. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपुष्टात आणण्यासाठी पुढील आठवड्यात अमेरिकेसोबत चर्चा करू, असे झेलन्स्की यांनी सांगितले होते. त्यानंतर एका तासात रशियाने वीज प्रकल्पावर हल्ले केले आहेत. ऊर्जामंत्री हेरमन हालुश्चेंको यांनी फेसबुकवर हल्ल्यांची माहिती दिली. ते म्हणाले, मुलासह दहा नागरिक जखमी झाले. रशिया आता वारंवार वीज आणि वायू निर्मिती ठिकाणांवर हल्ले करत आला आहे. त्याचे नागरिकांवर काय दुष्परिणाम होतील, याचा विचार त्यापूर्वीॅ केला जात नाही. हल्ल्यांचा परिणाम सामान्य नागरिकांना भोगावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles