सीरियात शस्त्रास्त्रांचा स्फोट; १६ जणांचा मृत्यू   

दमास्कस : सीरियाच्या किनारपट्टीवरील लट्टाकिया शहरात १३ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षातील शस्त्रास्त्रांचा स्फोट झाला. स्फोटामुळे एक इमारत कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला. तर १८ जण जखमी झाले आहेत. सीरियन सिव्हिल डिफेन्सने ही माहिती दिली. जुने बॉम्ब हाताळणार्‍या भंगार व्यापार्‍यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज व्हाईट हेल्मेट या नावाने ओळखल्या जाणार्‍या पॅरामेडिक ग्रुपने व्यक्त केला आहे.    
   
लट्टाकिया शहरात एका इमारतीच्या तळमजल्यावर भंगार दुकान आहे. या दुकानात जुन्या शस्त्रास्त्रांचा साठा होता. रविवारी दुपारी या दुकानात अचानक  शस्त्रास्त्रांचा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर चार मजली इमारत कोसळली. काँक्रीटच्या स्लॅबखाली इमारतीतील नागरिक अडकले होते. बचावपथकांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. पाच महिला आणि पाच मुलांसह १६ मृतदेह ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आले. १८ लोक जखमी झाले आहेत.
 
डिसेंबरमध्ये बशर असद यांची हकालपट्टी झाल्यापासून सीरियातील १ हजार ४०० हून अधिक न फुटलेल्या उपकरणांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्यात आली आहे आणि इदलेब, अलेप्पो, हामा, दीर-एझ-जोर आणि लट्टाकिया मधील १३८ खाणी आणि दूषित क्षेत्रे ओळखली गेली आहेत, असे संयुक्त राष्ट्रांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

Related Articles