८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त्   

नवी दिल्ली : इम्फाळ आणि गुवाहाटी विभागात ८८ कोटी रुपयांच्या मेथाम्फेटामाइन गोळ्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी    अमली पदार्थांचा चोरटा व्यापार करणार्‍या चार जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिली.
   
समाजमाध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये शहा यांनी म्हटले आहे की,  अमली पदार्थविरोधी मोहिम सध्या देशभरात राबविण्यात येत आहे. इम्फाळमध्ये गुरूवारी गुप्त माहितीच्या आधारे लिलोंग भागाजवळ एक मालमोटार पकडली. त्यामध्ये लपवलेल्या १०२.३९ किलो मेथाम्फेटामाइनच्या गोळ्या जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचा संशयित खरेदीदार पकडण्यात आला. गुवाहाटी झोनच्या अधिकार्‍यांनी सिलचरजवळ आसाम-मिझोराम सीमेवर एक मोटार आडवली. मोटारीच्या टायरमध्ये ७.४८ किलो मेथाम्फेटामाइनच्या गोळ्या आढळून आल्या. या प्रकरणी मोटार चालकाला अटक करण्यात आली.  ६ मार्च रोजी आयझॉलमधील ब्रिगेड बावनकावन येथे ४६ किलो क्रिस्टल मेथाम्फेटामाइन जप्त करण्यात आले होते, असेही शहा यांनी सांगितले.

Related Articles