’रामकृष्ण मुखी बोला | तुका जातो वैकुंठाला...’   

संत तुकाराम महाराज बीज सोहळा उत्साहात; अवघे देहू भक्तीमय
 
पिंपरी : ‘तुकोबांचा छंद लागला मनासी, ऐकता पदांसी कथेमाजीं, तुकोबाची भेटी होईल ते क्षण, वैकुंठासमान होये मज’ या संत बहिणाबाईंच्या अभंगानुसार तुकाराम बीजेनिमित्त श्री क्षेत्र देहू येथे भाविकांनी रविवारी अलोट गर्दी केली होती. हाती टाळ, कपाळी गंध, खांद्यावर पताका अन् मुखाने तुकोबारायांचा जयघोष करीत उन्हाची पर्वा न करता वारकर्‍यांनी बीजेचा सोहळा ‘याची देहा, याची डोळा’ अनुभवला.
 
‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रें यत्ने करूं’ असे म्हणून लोकांना शब्दधन वाटणार्‍या संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा बीज उत्सव काल उत्साहात साजरा झाला. सलग सुट्ट्यांमुळे यंदा भाविकांच्या गर्दीतही वाढ दिसून आली. परंपरेनुसार मुख्य मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. काकड आरतीानंतर श्रीविठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची महापूजा करण्यात आली.  चार वाजता संस्थानचे विश्वस्त, वंशज, वारकरी यांच्या हस्ते श्री पूजा, तसेच संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि वैकुंठस्थान मंदिर याठिकाणी महापूजा झाली. या वेळी देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे आणि विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे उपस्थित होते.
 
मुख्य मंदिरात महाराजांच्या पादुका ठेवलेली पालखी सजविण्यात आली होती. ती सकाळी साडेदहा वाजता वाजतगाजत वैकुंठस्थान मंदिराकडे नेण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी होती. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वैंकुठगमन मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालून पालखी  नांदुरकीच्या वृक्षाखाली आली. येथे बापूसाहेब देहूकर महाराज यांचे  परंपरेप्रमाणे घोटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हाती| मुक्त आत्मस्थिती सांडवीन॥ या अभंगावर कीर्तन झाले. दुपारी बारापर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला. हा मुख्य सोहळा असल्याने भवदुःख विसरून असंख्य भाविकांनी भगवद्सुखाचा आस्वाद घेतला. माध्यान्हाची वेळ येताच टाळमृदंगाचा घोष टिपेला पोचला. देहभान हरपून वारकरी तल्लीन झाले. बारा वाजून दोन मिनिटांनी ‘तुकोबा-तुकोबा’ असा जयघोष सर्वदूर निनादला आणि नांदुरकीच्या वृक्षाच्या दिशेने पुष्पवृष्टी करून सोहळ्याची समाप्ती झाली. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास पालखी पुन्हा देऊळवाड्यातील मुख्य मंदिरात आणण्यात आली. मुख्य मंदिरात पारंपरिक फडांची कीर्तने रंगली. धर्मशाळा, इंद्रायणी नदीच्या तीरांवर वैष्णव मंडळी तल्लीन झाली.
 
सामाजिक संस्था, संघटनांची वारकर्‍यांसाठी सेवा
 
लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या तुकाराम बीज सोहळ्यात वारकर्‍यांच्या सेवेसाठी आणि मदतीसाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. वारकर्‍यांच्या आणि भाविकांच्या सेवेत त्रुटी राहता कामा नये यासाठी सामाजिक संस्थांनी विविध सेवा दिल्या. पिण्याच्या पाण्यापासून ते विविध खाद्यपदार्थ आणि आरोग्य सेवेपर्यंतच्या सेवांचा यात समावेश होता. दरम्यान, बीज सोहळ्यानिमित्त प्रशासनातर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यंदा सोहळ्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील सात आगारातून देहूगावासाठी १२५ जादा बस सोडण्यात आल्या.

Related Articles