पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी लवकरच अधिकार्‍यांची नियुक्ती : जिल्हाधिकारी   

पुणे : पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल. भूसंपादन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या कायद्यानुसार केले जाईल. भूसंपादन वेळेत पूर्ण करण्यासाठी ४ ते ५ अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
 
पुरंदर विमानतळाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डुडी यांच्यासह भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाची वाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या ७ गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना, एमआयडीसीकडून नुकतीच जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये कोणत्या गावातील कोणत्या सर्व्हे नंबरमधील जमीन संपादित केली जाणार आहे. याची माहिती आहे, तसेच गावांच्या हद्दीचा त्यांमध्ये उल्लेख आहे.
 
विमानतळासाठी या ७ गावांतील २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन वेळेत होण्यासाठी ४ ते ५ अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. अधिकार्‍यांच्या नियुक्तीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

Related Articles