गुलटेकडीत दोन गटांमध्ये हाणामारी   

३ गंभीर, १४ जणांवर गुन्हा

पुणे : किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत शुक्रवारी घडली. याप्रकरणात परस्पराविरोधी फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या हाणामारीत तिनजण गंभीर जखमी झाले असून १४ जणांवर गुन्हा दाखल केला. तर दोघांना अटक करण्यात आली आहे. 
 
याबाबत केशव अनिल शिवशरण (वय २०, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रोहित सिंग, दर्शन सुतार, संकेत यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंग याला अटक करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीत शिवशरण, राहुल ढोणे, अक्षय कांबळे हे जखमी झाले आहेत.आरोपी आणि तक्रारदार शिवशरण हे मीनाताई ठाकरे वसाहतीत राहायला आहेत. शुक्रवारी (१४ मार्च) सायंकाळी शिवशरण याने आरोपी सिंग याला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. या घटनेनंतर सिंग, सुतार आणि साथीदार तेथे आले. त्यांच्याकडे कोयते, बांबू होते. कोयते उगारून आरोपींनी दहशत माजविली. आरोपींनी शिवशरण, ढोणे, कांबळे यांना मारहाण केली. मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर करत आहेत.
 
दरम्यान, रोहित सिंग (वय २८, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) याने परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. अभय शेखापुरे, सचिन खुडे, सागर कदम, संतोष कांबळे यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आरोपी सागर कदम याला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीत दर्शन सुतार, संदेश मेश्राम जखमी झाले आहेत. सचिन माने याच्याबरोबर का फिरतो, अशी विचारणा करुन आरोपींनी मारहाण केली. आरोपींनी बांबू आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. मारहाणीचा प्रकार सुरू असताना भाचा दर्शन सुतार, संदेश मेश्राम तेथे आले. तेव्हा आरोपींनी त्यांना मारहाण केल्याचे सिंग याने फिर्यादीत म्हटले आहे.
 
मीनाताई ठाकरे वसाहतीत दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळताच परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. फरारी झालेल्या दोन्ही गटातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles