पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत   

महिलांकडून बिहारी नृत्य, गायन  

पोर्ट लुईस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमधील भारतीय वंशाच्या नागरिकांनी मंगळवारी जंगी स्वागत केले. या प्रसंगी महिलांनी बिहारी सांस्कृतिक कार्यक्रम गीत गवई सादर केले.मॉरीशसच्या राष्ट्रीय दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आले होते. पोर्ट लुईस येथील विमानतळावर त्यांचे स्वागत भारतीय वंशाच्या नागरिकांनी उत्साहात केले.  
 
भोजपुरी संगीतातील गीत गवई नृत्याचा प्रकार आहे. तो ऐतिहासिक काळात महिलांनी भारतातून मॉरीशसमध्ये आणला असून तो  पुढील पिढीने जपला आहे. तो सादर करुन मोदी यांचे स्वागत केले. त्यामुळे मोदी भारावून गेले. त्यांनी पारंपरिक गाणी मनापासून ऐकली. भारतीय वारसा , संस्कृती आणि मूल्ये भारतीय नागरिकांनी जपली आहेत. त्या माध्यमातून दोन्ही देशांचे संबंध अधिक वाढीस लागले आहेत. अनेक पिढ्यांनी तो वारसा पुढे सुरू ठेवल्याचा अभिमान आहे, असे मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.  मोदी यांचे स्वागत करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. राष्ट्रध्वज तिरंगा देखील फडकाविला. मोदी यांचे स्वागत करण्यासाठी मॉरीशसचे पंतप्रधान डॉ. नविनचंद्र रामगुलाम स्वत: आले होते. मोदी विमानातून उतरताच भारतीय नागरिकांनी जल्लोष केला. रामगुलाम यांनी मोदी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. मोदी यांचा उल्लेख त्यांनी जवळचा मित्र असा केला. दोन्ही देश विविध क्षेत्रांत हातात हात घालून कार्य करतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

Related Articles