अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई   

नवी दिल्ली : मणिपूरमधील अशांततेच्या स्थितीवर सरकार केवळ भाषणे आणि बातम्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. वास्तविक परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी मंगळवारी संसदेत केला. मणिपूरला रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीने जोडण्याचे श्रेय भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला दिले.मणिपूरच्या अंदाजपत्रकावर मंगळवारी लोकसभेत चर्चा झाली, त्यावेळी ते बोलत होते.  
 
गोगोई म्हणाले, भाजप सरकार केवळ मथळ्यांवर नियंत्रण ठेवण्यावर भर देत आहे. ते भाषणांवर जास्त अवलंबून असते. त्यांची भाषणे आणि इव्हेंट मॅनेजमेंटकडे देशाने लक्ष आहे. परंतु वास्तविक परिस्थितीकडे सरकार लक्ष देत नाही. २०२३ मध्ये सभागृहात आलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमध्ये लवकरच शांतता प्रस्थापित करण्याचे अश्वासन दिले होते, परंतु जवळपास २१ महिन्यांनंतरही राज्यातील परिस्थिती गंभीर असून, तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
 
मोदी सरकारमुळेच देशवासीयांना ईशान्येकडील राज्यांची माहिती
  
भाजपचे विप्लव देव यांनी याला उत्तर देताना म्हटले, की काँग्रेसचे सदस्य गोगोई मणिपूरबद्दल बोलले, पण मोदी सरकार आल्यानंतरच देशवासीयांना ईशान्येकडील राज्यांची माहिती होऊ लागली आहे. मणिपूरमध्ये दीर्घकाळ काँग्रेसचे सरकार होते, मात्र मोदी सरकारच्या काळात मणिपूरमध्ये तीन राष्ट्रीय महामार्ग, पहिले रेल्वे स्थानक आदी बांधण्यात आले. विरोधी पक्षाचे सरकार ते करु शकले नाही. आज ईशान्येकडील ७५ टक्के भागात आफस्पा लागू नाही, याचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते, असे उत्तर भाजपकडून देण्यात आले.

Related Articles