व्यापार करारासाठी अमेरिकेसोबत वाटाघाटी   

वाणिज्य मंत्र्यांची माहिती; आयात शुल्क कपातीचा विचार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी करण्याची योजना आखत आहेत आणि दोन्ही देश बाजारपेठेतील प्रवेश वाढविणे, आयात शुल्क आणि गैर-शुल्क अडथळे कमी करणे आणि पुरवठा साखळी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतील, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री जतीन प्रसाद यांनी मंगळवारी संसदेत दिली. 
 
प्रसाद यांनी संसदेत लेखी उत्तरात याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, सध्या भारत ज्या प्रमाणे आयात शुल्क आकारतो. तसाच तो आकारण्यास अमेरिकेने अद्यापी सुरूवात केलेली नाही  दोन्ही देशांचे भले होणार्‍या क्षेत्रांबाबत चर्चा करण्यावर भर दिला जाणार आहे. त्या माध्यमातून द्विपक्षीय व्यापार करार देश करतील. दोन्ही देशांना परस्परांची बाजारपेठ मिळावी, नियोजित वाढीव आयात शुल्कात कपात व्हावी तसेच आयात शुल्काचे लोढणे व्यापार करताना एकमेकांच्या गळ्यात नसावे, पुरवठा साखळी वाढावी, यासाठी प्रयत्न केले जातील. 
 
दरम्यान, अमेरिकेने १३ फेब्रुवारी रोजी वाढीव आयात शुल्क भारतावरही लागू केले जाईल, अशी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी २ एप्रिलपासून करण्यात येईल, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते.  या निर्णयावर भारतावर कोणते परिणाम होतील, यावर विचारमंथन सुरु आहे, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढीव आयात शुल्क लागू करण्याच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी भारत आयात कर कमी करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. त्यावर भारत सरकारने प्रथमच अधिकृत  प्रतिक्रिया दिली असल्याचे मानले जात आहे. 

Related Articles