अखेर बिबट्या पिंजर्‍यात अडकला   

मंचर, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यातील ठाकरवाडी-चास येथे मंगळवारी पहाटे पिंजर्‍यात बिबट्या अडकला. बिबट्या पकडल्यामुळे ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.      
    
ठाकरवाडी परिसरात दशरथ पारधी, राया पारधी, रामजी काळे हे काही दिवसापूर्वी भर दुपारी शेळ्या चारत असताना बिबट्यांनी शेळ्यांवर हल्ला केला होता. त्यात दोन शेळ्या जखमी झाल्या होत्या. तसेच तेजस भोर हे उसाच्या शेतात पाणी भरत असताना त्यांना बिबट्यांनी दर्शन दिले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ठाकरवाडीच्या सरपंच आशा पारधी व चासच्या सरपंच अर्चना बारवे यांनी केली होती. तेजस भोर आणि प्रशांत भोर यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. पिंजर्‍यात दोन कोंबड्या ठेवल्या होत्या. मंगळवारी सकाळी प्रशांत भोर यांना पिंजर्‍यात बिबट्या अडकल्याचे दिसले.
 
वनविभागाला माहिती दिल्यांनतर वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक रईस मोमीन व बचाव पथक सदस्य सुशांत चासकर यांनी बिबट्याला ताब्यात घेतले. त्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आले. या कामी पोलीस पाटील वैभव शेगर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत शेगर, बन्सी शेगर आदींनी बिबट्याचा पिंजरा पिकअप गाडीत ठेवण्यासाठी मदत केली.

Related Articles