बियर-दारू दुकानांसाठी आता सोसायटीची एनओसी लागणार   

७५ टक्के रहिवाशांनी कौल दिल्यास दुकाने बंद करणार

मुंबई, (प्रतिनिधी) : गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घेणे बंधनकारक राहील. सोसायटीच्या एनओसी शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. तसेच, महापालिका वार्डमध्ये मद्यविक्रीचे दुकान बंद करायचे असेल तर नियमानुसार आलेल्या प्रस्तावावर झालेल्या मतदानापैकी ७५ टक्के मतदान ज्या बाजूने होईल, त्या बाजूने निर्णय होईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
 
राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बियर आणि दारु दुकानांना परवानगी दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा महेश लांडगे आणि राहुल कूल आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, सरकारची भूमिका राज्यात दारुविक्री वाढावी अशी नसून दारुबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आहे. १९७२ च्या नंतर राज्यात दारुविक्रीचे परवाने बंद आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दारुदुकानांना परवानगी नाही. स्थानिकांचा विरोध असेल तर मतदानाद्वारे दारुदुकाने बंद करण्याचा कायदा आहे.

Related Articles