ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यावर कारवाई   

मुंबई,  (प्रतिनिधी) : कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावताना परवानगी घेणे आवश्यक असून, सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत ते दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबलच्या मर्यादेतच सुरू ठेवता येतील. स्थानिक पोलिस निरीक्षकांवर यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात येईल. वेळ व आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. केंद्राच्या कायद्यातील तरतुदींमुळे पोलिसांना कारवाई करताना मर्यादा येतात. त्यामुळे  कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
 
भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांमुळे होणार्‍या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रार्थनास्थळांवर भोंगे लावले जातात. यामुळे अनेकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. सणावाराच्या दिवशी भोंगे लावले तर हरकत नाही. पण, हे भोंगे दिवसातून पाच वेळा वाजत असतात. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस आयुक्तांना पत्र पाठवूनही कोणतीही कारवाई केली नव्हती. 

Related Articles