मोशीत संभाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारण्यास पालिकेची मान्यता   

पिंपरी:  प्रभाग क्र. २ बोर्‍हाडेवाडी, मोशी प्राधिकरण येथील पेठ क्र. ५ आणि ८ येथील ताब्यात आलेल्या जागेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० फुट उंच पुतळा उभारण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका सभेत मान्यता दिली. तर  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये एसइइ लर्निंग प्रकल्प राबविण्यासाठी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्ट्ररनेटिव्स लडाख येथे अभ्यासदौरा आयोजित करण्याबाबतच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली.
 
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समिती सभा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. केशवनगर, चिंचवड येथील विद्युत दाहिनीची ३ वर्षासाठी देखभाल दुरुस्ती करणे, महापालिकेच्या सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयाच्या स्वच्छता आणि देखभाल दुरुस्तीसाठी येणार्‍या खर्चास मान्यता देणे, महापालिकेच्या प्रभाग क्र. २६ येथील कस्पटेवस्ती, कावेरीनगर, वेणूनगर व इतर परिसरातील रस्ते डब्ल्यूएमएम आणि एमपीएम या पद्धतीने विकसित करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
 
प्रभाग क्र. २ बोर्‍हाडेवाडी मोशी प्राधिकरण येथील पेठ क्र. ५ आणि ८ (पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी आणि कन्वेन्शन सेंटर झखएउउ) येथील १०,११७.१४ चौरस मीटर (२.५ एकर) जागेचा आगाऊ ताबा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण स्मारकासाठी देण्यात आला आहे. तथापि महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णयानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यासाठी मान्यता देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आला असून त्यानुषंगाने प्राधिकरण पेठ क्र. ५ आणि ८ येथील महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेल्या जागेवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० फुट उंच  पुतळा उभारण्याच्या ठरावास प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका सभेत  मान्यता दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी एसइइ हा नवीन प्रकल्प निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेनुसार एका नवीन समितीची स्थापना करण्यात येणार असून २० ते २५ शिक्षकांची निवड एसइइ लर्निंग मास्टर ट्रेनर म्हणून सहाय्यक आयुक्त , शिक्षण विभाग यांच्या नियंत्रणाखाली समितीची निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. या ६ दिवसाच्या अभ्यासदौर्‍यासाठी येणार्‍या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती सभेत मान्यता दिली.

Related Articles