क्रीडा मंत्रालयाने मागे घेतले भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन   

नवी दिल्ली : ब्रिजभूषण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन मागे घेतले. महिला खेळाडूचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे जवळचे सहकारी असलेले डब्लूएफआय अध्यक्ष संजय सिंह यांना सरकारने पूर्ण नियंत्रण दिले आहे. २४ डिसेंबर २०२३ रोजीच्या आदेशानंतर, क्रीडा मंत्रालयाने डब्लूएफआयचे निलंबन केले होते आणि भारतीय ऑलिंपिक असोसिएशनला राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी एक तदर्थ समिती स्थापन करण्यास सांगितले होते.दरम्यान, आता खेळ मंत्रालयाने पत्र लिहून भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठवण्यात आल्याची माहिती दिली आहे. 
 
कुस्ती महासंघ आता देशांतर्गत स्पर्धा आयोजित करू शकते आणि राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू निवडू शकते. २४ डिसेंबर २०२३ रोजी, क्रीडा मंत्रालयाने १५ वर्षांखालील आणि २० वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जाहीर करण्यात घाई केल्याबद्दल भारतीय कुस्ती महासंघावर बंदी घातली होती. त्यावेळी, संजय सिंह यांच्या पॅनलने २१ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या डब्लूएफआय निवडणुकीत विजय मिळवला होता, पण राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे ठिकाण असलेल्या गोंडा येथील नंदिनी नगरमध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांची मजबूत पकड होती.  आता क्रीडा मंत्रालयाने ४४२ दिवसांनंतर कुस्ती महासंघावरील बंदी उठवली आणि संजय सिंह यांना कुस्ती महासंघाची पूर्ण कमान मिळाली.

Related Articles