बांगलादेशातून भारतात वैद्यकीय पर्यटन घटले   

वृत्तवेध 

तणावपूर्ण संबंध आणि व्हिसा निर्बंधांमुळे बांगलादेशमधून भारतात येणार्‍या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. पर्यटन मंत्रालयाच्या नवीन आकडेवारीनुसार, भारताचे वैद्यकीय मूल्य पर्यटन (एमव्हीटी) नोव्हेंबर २०२४ मध्ये वार्षिक ४३ टक्के तर डिसेंबर २०२४ मध्ये ५९ टक्क्यांनी घसरले.नऊ महिन्यांच्या खंडानंतर बांगलादेश आणि भारतादरम्यान रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणे हे एक सकारात्मक चिन्ह आहे; परंतु ‘एमव्हीटी’ पूर्णपणे सुधारण्यासाठी वेळ लागेल. नवीन व्हिसासाठी अर्जदेखील मर्यादित आहेत. भारताने बांगलादेशसाठी व्हिसा ऑपरेशन्स कमी केल्यामुळे आणि फ्लाईट ऑपरेटर मर्यादित क्षमतेने काम करत असल्याने परिस्थिती अजूनही आव्हानात्मक आहे. सध्या प्रवास करणार्‍या अनेक रुग्णांनी संकट अधिक गडद होण्यापूर्वी व्हिसासाठी अर्ज केले होते. त्यांना व्हिसा मिळाला; परंतु नवीन अर्ज मर्यादित आहेत.
 
‘एमव्हीटी’मधील घसरणीचा विशेषत: कोलकाता आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय रूग्णांवर अधिक अवलंबून असलेल्या रुग्णालयांवर अधिक परिणाम झाला आहे. बांगलादेशाने आरोग्यासाठी समाविष्ट केलेल्या हॉस्पिटल साखळीमध्ये अपोलो हॉस्पिटल्स अधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे, तर ‘अ‍ॅस्टर डीएम हेल्थकेअर’ आणि ‘ फोर्टीस हेल्थकेअर’वर तुलनेने कमी परिणाम होण्याची शक्यता आहे. २०२२ मधील एका अहवालानुसार, भारतातील ६९ टक्के वैद्यकीय पर्यटक बांगलादेशमधून आले होते. भारताच्या ‘एमव्हीटी’मध्ये बांगलादेशचे ७० टक्के योगदान आहे.

Related Articles