पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस   

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली जबाबदारी 

कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मंगळवारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) क्वेटाहूनपेशावरकडे चाललेल्या रेल्वेचे अपहरण केले. यावेळी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानी सैनिकांत चकमक उडाली. यात २० सैनिक ठार झाले असून, बीएलएने १८२ जणांना ओलिस धरले आहेत. यात पाकिस्तानी लष्करातील काही अधिकारी आणि आयएसआयच्या एजंटांचा समावेश आहे. काही सशस्त्र व्यक्तींनी रेल्वेवर अचानक गोळीबार केला. यामध्ये रेल्वेच्या चालकासह अनेक प्रवासी जखमी झाले, असे स्थानिक प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.
 
बलुचिस्तानच्या कच्छी जिल्ह्यात बीएलएने जाफर एक्सप्रेसचा ताबा घेतला. ही एक्सप्रेस पख्तूनख्वा येथील पेशावरकडे निघाली होती. या एक्सप्रेसमध्ये ५०० हून अधिक प्रवासी होते. अपहरणाच्या घटनेची माहिती समजताच सुरक्षा दल आणि बचाव पथके घटनास्थळाकडे रवाना झाली, असे अधिकार्‍यांनी सांगितले.रेल्वेचा चालक गंभीर जखमी झाला असून मदतीसाठी आपत्कालीन ‘मदत रेल्वे’ पाठविण्यात आली आहे, असे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी हल्ल्यास अधिकृत दुजोरा दिला आहे. पीरु कोनेरी आणि गुदालार दरम्यान एक्सप्रेसवर गोळीबार करण्यात आला, असे सांगण्यात येते. 
 
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणार्‍या बीएलएने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दलासह काही व्यक्तींना ओलिस ठेवण्यात आले असल्याचे बीएलएने म्हटले आहे.बीएलएने १८०० हून अधिक जणांना ओलिस धरले असून २० सुरक्षा कर्मचारी ठार झाले असल्याचे वृत्त आहे. मात्र, मृतांची अधिकृत संख्या स्पष्ट झालेली नाही. पाकिस्तानी लष्कराच्या काही अधिकार्‍यांना ओलिस ठेवण्यात आले असल्याचे बीएलएने म्हटले आहे.क्वेटा- पेशावर मार्गावर एकूण १७ बोगदे आहेत. हा सर्व डोंगराळ भाग आहे. शिवाय, अनेक अवघड वळणे आहेत. त्यामुळे रेल्वेचा वेग कमी असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.बलुचिस्तान  सरकारने स्थानिक अधिकार्‍यांना आपत्कालीन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 
 
बलुचिस्तान प्रांत इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. दरम्यान, सिबी रुग्णालयात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. रुग्णवाहिका आणि सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. मात्र, डोंगराळ भागामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.नागरिकांनी शांत राहावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अधिकार्‍यांनी केले आहे. क्वेटाच्या शासकीय रुग्णालयातही आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. डॉक्टर, परिचारिका सह अन्य अतिरिक्त कर्मचार्‍यांना तातडीने कामावर बोलावले असल्याचे अधिकारी म्हणाले. मध्यंतरी, काही दिवस क्वेटा ते पेशावर रेल्वे सेवा बंद होती. मात्र, १ ऑक्टोबर पासून ही सेवा सुरू झाली.मागील वर्षभरात बलुचिस्तानात हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये क्वेटा रेल्वे स्थानकातील आत्मघातकी हल्ल्यात २६ जण ठार झाले होते. तर, ६२ जण जखमी झाले होते.
 
• पाकिस्तानी सैनिकांनी कारवाईचा प्रयत्न केला तर, सर्व ओलिसांना ठार मारले जाईल, असे बीएलएने म्हटले आहे. महिला आणि मुलांना सोडण्यात आले असल्याचेही संघटनेने सांगितले.
• दीडशेहून अधिक प्रवासी आणि सुरक्षा कर्मचारी आमच्या ताब्यात असल्याचे बीएलएने म्हटले आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचे काही एजंट आमच्या ताब्यात असल्याचा दावा बीएलएने केला आहे. पाकिस्तान दहशतवादविरोधी दलाचे काही जण आमच्या ताब्यात असल्याचा दावादेखील त्यांनी केला. 
• नऊ डब्यांचा समावेश असलेल्या जाफर एक्सप्रेसमध्ये ५०० हून अधिक प्रवासी होते. बोगदा क्रमांक ८ मध्ये सशस्त्र व्यक्तींनी रेल्वे रोखली. रेल्वेतील प्रवासी आणि कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे रेल्वेचे नियंत्रक महमद काशीफ यांनी सांगितले. ही घटना संभाव्य दहशतवादी घटना असू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Articles