करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका   

पुणे :अंदाजपत्रकात राज्यातील हलक्या व मध्यम आकाराच्या व्यावसायिक वाहनांना वजनाच्या ७ टक्के प्रमाणे कर आकारला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे वाहन मालकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. वाढलेल्या रक्कमेचा बोजा वाहन मालकांना सहन करावा लागणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य वाहनचालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली. 
 
शिंदे म्हणाले, राज्य शासनाने जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात राज्यातील लाईट कमर्शियल व्हेईकलला आकारला जाणारा आरटीओचा कर हा कर यापूर्वी वाहनाच्या वजनाच्या किलोवर आकारला जात होता. तीन चाकी टेम्पोसाठी १३५००, चार चाकी टेम्पोसाठी १८९०० तर ४०७ टेम्पोसाठी २८९०० असा कर आकारला जात होता. मात्र आता एक एप्रिल पासून आरटीओ कर हा वाहनाच्या वजनावर ७ टक्के प्रमाणे आकारला जाणार आहे. यामुळे वाढलेल्या रकमेचा बोजा सर्वसामान्य वाहन चालकांवर पडणार आहे. याचा आर्थिक फटका टेम्पो चालकांना बसणार आहे, तसेच खासगी वाहनाच्या आरटीओच्या करामध्ये एक टक्का वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ होणार आहे. त्याचाही फटका वाहन चालकांना बसणार आहे. सरकारने याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी बाबा शिंदे यांनी केली आहे. 

Related Articles