अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक   

पुणे : नशा करण्यासाठी अमली पदार्थांची खरेदी करणे परवडत नसल्यामुळे तरूणांनी काही ठराविक औषधांचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. नशेसाठी वापरण्यात येणारी औषधे विकणार्‍या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. योगेश सुरेश राऊत (वय २५, मांजरी, हडपसर), निसार चाँद शेख (वय २३, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस शिपाई महेश चव्हाण यांनी याप्रकऱणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
 
आरोपी राऊत आणि शेख यांनी औषध निर्मिती अभ्यासक्रमाची पदवी नाही, तसेच त्यांच्याकडे अन्न आणि औषध विभागाकडून (एफडीए) दिला जाणारा परवाना नाही. राऊत आणि शेख यांच्याकडे बेकायदा औषधांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नशेसाठी या औषधांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हडपसर भागातील जिजामाता वसाहत परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून औषधांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारच्या औषधांचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो, तसेच मृत्यू होऊ शकतो, असे पोलीस शिपाई चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत. हडपसर परिसरातून सहा महिन्यांपूर्वी नशेच्या विळख्यात अडकलेल्या  तरुणीला नशेसाठी वापरल्या जाणार्‍या औषधांची विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Related Articles