कुकी भागातील जनजीवन विस्कळीत   

मणिपूर हिंसाचार

इंफाळ/चुरचंदपूर : मणिपूरमध्ये सुरक्षा रक्षकांनी आक्रमक कारवाई केल्याच्या निषेधार्थ कुकी झो गटाने रविवारी कुकी प्रभावीत क्षेत्रात बंद पाळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कांगपोकप जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि आंदोलक यांच्यात शनिवारी झटापट झाली होती. तेव्हा एका नागरिकाचा मृत्यू तर ४० जखमी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ८ मार्चपासून राज्यात सर्वांता मुक्तपणे फिरता यावे, असे वातावरण करण्याचे आदेश १ मार्च रोजी सुरक्षा दलांना दिले होते. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली होती. त्याला कुकी समुदायाने तीव्र विरोध करुन आंदोलन केले होेते. काल कुकी समुदायाचा प्रभाव असणार्‍या भागात तणावाचे वातावरण होते. कुकी झो गटाने सुरक्षा रक्षकांनी केलेल्या आक्रमक कारवाईचा निषेध करत काल बंद पाळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कुकी समुदायाचे प्राबल्य असलेल्या चुरचुंदपूर आणि तेंगनोपाल येथे आंदोलकांनी रस्त्यावर जळते टायर फेकले. तसेच मोठे दगड टाकून रस्ते बंद केले होते. ते हटविण्याचे काम सुरक्षा रक्षकांंकडून सुरू आहे. दरम्यान, काल कोणतीही हिंसक घटना घडली नसून परिसरात तणाव मात्र होता. दुकाने बंद असल्याने व्यापार बंद होता. रस्त्यावरून एकही वाहन धावले नाही.

Related Articles