‘गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य होते’   

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल 

नवी दिल्ली : महाकुंभदरम्यान गंगा आणि यमुना नद्यांचे पाणी स्नान करण्यासाठी योग्य होते, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, महाकुंभ सुरू झाल्यापासून प्रदुषण नियंत्रण मंडळाने  दर आठवड्यात दोनदा नदीच्या पाण्याची चाचणी आणि परीक्षण केले आहे. १२ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत गंगा नदीच्या पाच ठिकाणी आणि यमुना नदीच्या दोन ठिकाणी पाण्याचे निरीक्षण करण्यात आले. त्यासाठी तज्ज्ञांची समिती तैनात करण्यात आली होती. गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी योग्य असल्याचा निष्कर्ष या समितीने काढला आहे. 
   
मात्र, येथे सांख्यिकीय विश्लेषणाची गरज आहे, कारण वेगवेगळ्या तारखांना नमुने गोळा केले गेले आणि हे सर्व नमुने वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतले गेले. वेगवेगळ्या नमुन्यांमुळे संपूर्ण नदीच्या पाण्याच्या पातळीचे अचूक मूल्यांकन करणे खूप कठीण होते.दरम्यान, मागील महिन्यात गंगेचे पाणी प्रदुषित झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले होते. १७ फेब्रुवारीच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात गंगेच्या पाण्यात १०० मिली पाण्यात विष्ठा कोलिफॉर्मचे प्रमाण २ हजार ५०० युनिट्सपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले होते.

Related Articles