पानिपत महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५० टक्के मतदान   

पानिपत : हरयानाच्या पानिपत महानगरपालिकेच्या महापौर आणि २६ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी रविवारी (९ मार्च) मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार येथे ५०.१ टक्के मतदान झाले. येथील एकूण ३६५ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले. 
  
पानिपत महानगरपालिकेत महापौरपदासाठी चार उमेदवार आणि २६ नगरसेवकपदांसाठी १०३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ४.११ लाख मतदार मतदान करणार आहेत. यापैकी २.१८ लाख पुरुष, १.९२ लाख महिला आणि १५ ट्रान्सजेंडर आहेत. यापूर्वी दोन मार्च रोजी गुरुग्राम, मानेसर, फरिदाबाद, हिस्सार, रोहतक, कर्नाल आणि यमुनानगर या सात महापालिकांच्या महापौर आणि प्रभाग सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते.
१२ मार्चला निकाल 
   
अंबाला आणि सोनीपतमध्ये महापौरपदासाठी पोटनिवडणूक आणि २१ महापालिका समित्यांच्या अध्यक्ष आणि प्रभाग सदस्यांच्या निवडणुकाही दोन मार्च रोजी झाल्या. मतमोजणी १२ मार्च रोजी होणार असून त्याच दिवशी पानिपतसह सर्व महापालिकांचे निकाल जाहीर होतील. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी नुकतेच सांगितले होते की, महापालिका निवडणुकीत भाजपच जिंकेल आणि ट्रिपल इंजिनचे सरकार आल्यानंतर तिप्पट वेगाने काम केले जाईल. त्याचवेळी काँग्रेसने पक्षाच्या उमेदवारांना पूर्ण बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले होते.

Related Articles