समृद्धी महामार्गावर २२ ठिकाणी उभारणार स्वच्छतागृह   

मुंबई : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २२ ठिकाणी कंटेनर शौचालय उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एमएसआरडीसीने हा निर्णय घेतला आहे. महामार्गावर प्रवासी आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी २० आसन क्षमतेची ही शौचलये असणार आहेत. या शौचालयांमध्ये महिला, पुरूष आणि दिव्यांग नागरिकांसाठी व्यवस्था केली जाणार आहे.  पुरुषांसाठी ८, दिव्यांग पुरुषांसाठी २, महिलांसाठी ८ आणि दिव्यांग महिलांसाठी २ अशी आसन व्यवस्था असेल. या शौचालयाच्या उभारणीसाठी एमएसआरडीसीने कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत.
 
६० ते ६५ किलोमीटर अंतरावर ही शौचालये असणार आहेत. महत्वाचे म्हणजे ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर आता रेस्टॉरंट, ढाबा, गॅरेज, पार्किंग लॉट, टॉयलेट यासारख्या वेगवेगल्या सुविधाही उभारण्यात येणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास फक्त ८ तासांमध्ये गाठता येणार आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी एमएसआरडीसीने तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. सध्या समृद्धी महामार्गावरील नागपूर ते इगतपुरी हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे. लवकरच इगतपुरी- आमने हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला होण्यापूर्वी त्याठिकाणी प्रवाशांसाठी सर्व सोयीसुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles