मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी   

 

पुणे : मोफत शिक्षण, नोकर्‍यांसह विविध मागण्यांसाठी मेट्रोच्या रूळावर उतरून आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निलंबित कार्यकर्ता नरेंद्र पावटेकर, त्याचे वडील ज्ञानेश्वर पावटेकर यांच्यासह नऊजणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर उर्वरित आठ आरोपींच्या पोलिस कोठडीच्या हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी हा आदेश दिला.
  
पुणे मेंट्रोच्या पुणे महापालिका स्थानकाजवळच्या रूळावर पेट्रोल घेऊन आंदोलन करणार्‍यांनी रूळासह वायरीचे नुकसान केले आहे. मेट्रोसारख्या संवेदनशील ठिकाणीच आंदोलन करण्यामागे आंदोलकांचा घातपाताचा हेतू होता का, त्यांनी मेट्रो स्थानकावर येण्यापूर्वी कोणाला फोन, मेसेज केले होते. तसेच या घटनेमागचा सूत्रधार कोण, याबाबत तपास करावयाचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी रविवारी दुपारी दोन तास पुणे महापालिका मेट्रो स्थानकाच्या रूळावर उतरून आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांशी वाद घालत धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. 
 
या झटापटीत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत याच्यासह पाच पोलिस कर्मचारी आणि महिला जखमी झाल्या. त्यानंतर सर्व आंदोलकांवर खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमविणे, दंगल आणि मेट्रो रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या आंदोलकांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा कोणताही आदेश नसतानाही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, विभागीय आयुक्त कार्यालयासारख्या शासकीय कार्यालयांऐवजी मेट्रोसारखे संवेदनशील ठिकाणच का निवडले, आरोपी माध्यमांना का बोलवा, असे म्हणत होते. त्यामागे त्यांचा कोणता उद्देश होता. त्यांनी गुन्ह्याचा कट कोठे रचला, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील श्रीधर जावळे आणि तपास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केली. आंदोलक विरोधी पक्षातर्फे समाजहिताचे आंदोलन करत होते. 
 
या आरोपींना पोलिस कोठडी 
 
नरेंद्र ज्ञानेश्वर पावटेकर (वय २५), ज्ञानेश्वर गणपतराव पावटेकर (वय ६२, दोघेही रा. गणेश पेठ), अतुल सुदाम गायकवाड (वय ४५, रा. लोणीकाळभोर), भरतगिर सोमवारगिर गिरी (वय ३५, रा. डांगे चौक), अजिंक्य संग्राम कदम (वय २१, रा. धनकवडी), गणेश असोक जवंजाळ (वय ४६, रा. कसबा पेठ), प्रियांका कुणाल धंडुके (वय २७, रा. रविवारपेठ), सुकन्या राजेंद्र जोरकर (वय २९, रा. सोमवार पेठ) आणि कल्पना महेंद्र परदेशी (वय ४६, रा. गणेश पेठ) 

Related Articles