यंदा गहू राहणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात   

पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढले

पुणे : नवीन गव्हाची बाजारात आवक सुरू झाली आहे. येत्या काळात ही आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यंदा गव्हासाठी पोषक वातावरण होते. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून यंदा गव्हाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहणार असल्याचा अंदाज आहे. अशी माहिती मार्केटयार्डातील व्यापारी अभय संचेती यांनी दिली. 
 
बाजारात मार्चपासून नवीन गव्हाची आव सुरू होते. पोषक वातावरणामुळे महाराष्ट्र, सौराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे  मागील वर्षीच्या तुलनेत आवक वाढणार आहे. आवक वाढल्याने गव्हाचे दर टिकून राहतील. डिसेंबर अखेर ३१९.७४ लाख हेक्टरवर गहू लागवड झाली आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा सात लाख हेक्टरने गहू लागवडीचे क्षेत्र वाढले असल्याचेही संचेती यांनी नमूद केले. 
 
केंद्र सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदाच्या हंगामात देशात गव्हाचे विक्रमी म्हणजे सुमारे ११५० लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे. तर पुणे बाजारात रोजची ३ हजार क्विंटलची आवक होत असते. मध्यप्रदेश, गुजरातहून आवक वाढणार आहे. या राज्यात गहू लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. हंगामात पाण्याची उपलब्धता चांगली असून, गहू पिकासाठी पोषक असलेली थंडीही चांगली होती. त्यामुळे यंदा गहू आवक वाढली आहे. १५ मार्चनंतर मार्केटयार्ड भुसार बाजारात गहू खरेदीसाठी ग्राहकांकडून खरेदी करण्याची लगबग सुरू होते आणि मार्केट यार्डात भुसार दुकानात गर्दी केली जाते. ग्राहकांकडून ५० ते १०० किलोपर्यंत गहू वर्षभरासाठी खरेदी केला जातो. नवा गहू बाजारात आला की वर्षभर साठवणुकीचा गहू ग्राहक घेऊन ठेवतात. नवा गव्हात थोडासा ओलावा असतो. त्यामुळे उन्हाळ्यात गहू खरेदी केला की त्यास एक वेळा वाळविला पाहिजे. त्यानंतर गहू चांगला राहतो. असेही अभय संचेती यांनी सांगितले.
 
घाऊक बाजारातील गव्हाचे दर
 
  गहू                           दर
लोक वन                 ३५ ते ४२
शरबती(सिहोर)         ४२ ते ४८
 
चांगल्या मालाचे दर टिकून राहतील 
 
यंदा गव्हाला पोषक वातावरण होते. त्यामुळे यंदा विक्रमी गहू उत्पादन झाले आहे. मार्केटयार्डातील भुसार बाजारात नवीन गव्हाची मार्चपासून आवक सुरू होते. आवक वाढली तरी उठाव ही तेवढाच राहणार असल्याने चांगल्या मालाचे दर कमी होण्याची शक्यता कमी आहे. आवक अधिक राहिल्यास दरही टिकून राहतील. 
- अभय संचेती, ज्येष्ठ व्यापारी, मार्केटयार्ड

Related Articles