आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढीची मागणी   

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशांसाठीची ऑनलाइन सोडत झाली. सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी तसेच प्रवेश निश्चित करण्यासाठी आज (सोमवार) शेवटची मुदत आहे. मात्र, ही मुदत वाढवून देण्याची मागणी पालकांनी केली आहे. सद्य:स्थितीत एकूण जागांपैकी १ हजार ६६५ जागा रिक्त आहेत.
 
पिंपरी-चिंचवड शहरातील १७० खासगी शाळांनी नोंदणी केली आहे. त्या शाळांमध्ये ३ हजार ४३५ जागा आहेत. यासाठी पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ६८ हजार ९० पालकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यासाठी सोडत पार पडली. सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी केंद्राची सोय करण्यात आली आहे. पिंपरी व आकुर्डी अशा दोन ठिकाणी पालकांना आपल्या पाल्याच्या कागदपत्रांची पडताळणी करता येते.
 
कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शाळेमध्ये बालकाचा प्रवेश निश्चित केला जातो. आकुर्डी उन्नत केंद्रामध्ये २ हजार २९२ पैकी १ हजार १९३ प्रवेश झाले आहेत. तर पिंपरी उन्नत केंद्रामध्ये १ हजार १४३ पैकी ५७७ प्रवेश झाले आहेत. एकूण जागांच्या १ हजार ७७० प्रवेश झाले असून अद्याप १ हजार ६६५ जागा शिल्लक आहेत. प्रवेश अर्जासाठी १० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. उन्हाचा तडाखा आणि इतर कारणांमुळे ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी पालकांची मागणी आहे.यासंदर्भात महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर म्हणाल्या, मुदत वाढवून देण्याबाबत शासनस्तरावर निर्णय होईल. सध्या पिंपरी आणि आकुर्डी या दोन्ही केंद्रांमध्ये कागदपत्राची पडताळणी व प्रवेश निश्चिती सुरू आहे.

Related Articles