केंद्रीय विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू   

पुणे : केंद्रीय विद्यालयातील इयत्ता पहिली आणि बालवाटिकेच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे किमान वय ६ वर्षे असावे. याशिवाय बाल वाटिका- १,२ आणि ३ मध्ये प्रवेशासाठीचे वय अनुक्रमे ३ ते ४ वर्षे, ४ ते ५ वर्षे आणि ५ ते ६ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. वर्गात निवड झालेल्या उमेदवारांची पहिली यादी आणि प्रतीक्षा यादी २५ मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
 
बाल वाटिकेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी २६ मार्च रोजी प्रसिद्ध केली जाईल. पहिल्या यादीनंतर जागा रिक्त राहिल्यास दुसरी यादी २ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाईल. बालवाटिकेत जागा रिक्त राहिल्यास, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गांसाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी दुसरी अधिसूचना ७ एप्रिल रोजी जारी केली जाईल. अशा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ८ एप्रिलपासून सुरू होईल. बालवाटिका- २ आणि वर्ग- २ आणि यांसारख्या इतर वर्गांमध्ये प्रवेश दिला जाईल.
 
वर्ग- २, बालवाटिका-२ आणि इतर वर्गांमध्ये प्रवेश प्रक्रिया २ एप्रिलपासून सुरू होईल आणि ११ एप्रिलपर्यंत चालेल. ज्या वर्गांमध्ये जागा रिक्त आहेत. त्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बालवाटिका- २, वर्ग- २ आणि इतर वर्गांमध्ये प्रवेशासाठी पहिली यादी १७ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाईल. अकरावी वगळता सर्व वर्गांमध्ये प्रवेशाची अंतिम तारीख ३० जून असेल. ३० जूननंतर जागा रिक्त राहिल्या, तर विशेषाधिकार प्राप्त मुलांना प्राधान्यक्रमाने निर्धारित मर्यादेवर प्रवेश देण्यात येणार आहेत, असे केंद्रीय विद्यालय संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles