एचएसआरपी नंबरप्लेटच्या नावाने लूट थांबवा   

पिंपरी : एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी नागरिकांकडून अन्य राज्यांच्या तुलनेत तिप्पट शुल्क वसूल केली जात आहे. त्यामुळे ही आर्थिक लूट थांबवून हे शुल्क कमी करावे. तसेच नंबर प्लेट बसविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विनोद वरखडे यांनी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली आहे.
 
विनोद वरखडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. तर राज्य सरकारने एचएसआरपी नंबरप्लेटसाठी खासगी कंपन्यांना सहाशे कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. मात्र या कंपन्या नंबरप्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल करत आहेत.
 
विशेष म्हणजे गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्येही याच कंपन्यांना नंबरप्लेटचे काम दिले आहे. पण त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत.या तीन खासगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट दिले याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच सदरची अवाजवी लूट रोखण्यासाठी ही कंत्राटे रद्द करून सामान्यांना परवडतील असे दर ठेवून नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. तसेच या दरात कपात झाल्यानंतर आकारलेली अधिकची रक्कम संबंधित नागरिकांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles