हा देश गांधी, नेहरूंचा...   

खासदार डॉ. मनोज कुमार झा यांचे प्रतिपादन

पुणे : आज देशातील वातावरण तापले आहे. ते भयंकर विषारी झाले आहे. महात्मा गांधींची हत्या करणार्‍याचे कौतुक करणारे संसदेची पायरी चढतात हा फरक या देशात झाला आहे. हा देश गांधी, नेहरूंचा आहे. या देशाला जिवंत राहायचे असेल आणि श्वास घ्यायचा असेल तर गांधी गांधी करावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभेतील खासदार डॉ. मनोज कुमार झा यांनी शुक्रवारी केले.
 
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधी भवन येथे गांधी विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उदघाटन डॉ. मनोज कुमार झा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष सुरेश द्वादशीवार, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी,  स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, गीताली वि म, सचिव अन्वर राजन, एम. एस. जाधव, मिलिंद गायकवाड, रमेश आढाव , प्रा. मच्छिंद गोरडे, अप्पा अनारसे उपस्थित होते.
 
झा म्हणाले, बापूंवर बोलणारे, ऐकणारे कमी होत चालले आहेत. परिस्थिती बदलली नाही तर आपल्या सारखे लोक केवळ संग्रहालयात असतील. गांधी आज असते तर त्यांनाही यूएपीए कायदा लावण्यात आला असता. औरंगजेब, बाबर आणि तुघलक यांच्या बाजूने किंवा विरोधात बोलून बातम्यांमध्ये राहण्याचे काम काही लोक सध्या करत आहेत. बापूंशी असहमत असू शकता. प्रत्येकाच्या विचारात फरक असतो. पण, बापूंना नाकारणार कसे? राजघाटावर जाऊन बापूंना श्रद्धांजली वाहण्याचे कर्मकांड झाले आहे. गांधींचा केवळ प्रतिमेसाठी वापर करणार्‍यांपासून आपण सावध राहिले पाहिजे. गांधी कधी मरणार नाही. आज सगळीकडे भिंती उभ्या झाल्या आहेत. 
 
देशमुख म्हणाले, देशातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संस्कृती ढासळली आहे. गांधी विचार मानवतेचा, सद्भावनेचा विचार आहे. गांधींना बदनाम करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न सुरू आहे. संघ परिवार आणि मूठभर अभिजन लोक गांधींना बदनाम करीत आहे. हे टाळायचे असेल तर तुम्ही , आम्ही सर्वांनी थोडे थोडे गांधी व्हायला पाहिजे. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन धनश्री यांनी  केले. आभार अन्वर राजन यांनी मानले.
 
मराठी साहित्यिकांना गांधींवर लिहावेसे वाटले नाही ?
 
जगाला दिशा देणार्‍या थोड्या व्यक्ती होऊन गेल्या. त्यामध्ये गांधी आहेत. उपनिषदांनी, गौतम बुद्धांनी, सॉक्रेटिसने मानवाला दिशा दिली. त्यानंतर गांधींनी ते काम केले. महाराष्ट्र गांधींच्या बाबतीत कृतज्ञ राहिला नाही. महाराष्ट्राने गांधींना  नेते, कार्यकर्ते, अनुयायी दिले. पण, येथील एकाही साहित्यिकाने गांधींचे चरित्र लिहिले नाही. फ्रान्सच्या लेखकाला गांधींवर लिहावेसे वाटले पण मराठी साहित्यिकांना का वाटले नाही?  लुई फिशर यांना लिहावेसे वाटते. अ‍ॅटनबरो यांना चित्रपट काढला. मात्र आपण असे काहीच केले नाही, असेही सुरेश द्वादशीवार यांनी सांगितले.

Related Articles