अंतिम सामन्यात विराट विक्रमी कामगिरी करणार?   

नवी दिल्ली : भारताचा आक्रमक फलंदाज विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये परतला आहे. विराट कोहली म्हटलं की आक्रमक खेळाडू, विरोधी संघाच्या खेळाडूंना आक्रमकपणानं उत्तर देणारा खेळाडू अशी ओळख विराटची होती. विराट कोहलीने यापूर्वी विरोधी संघांच्या खेळाडूंना आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, विराट कोहलीनं रणनीती बदलली असून त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर देखील दिसून आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील दोन प्रमुख सामन्यांमध्ये म्हणजेच पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध  विराट कोहलीनं चौकार आणि षटकार मारण्याऐवजी एक- एक  धाव घेत धावफलक बदलता ठेवण्याची भूमिका घेतली. विराटच्या याच रणनीतीनं ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची झोप उडाली. आता न्यूझीलंडला देखील याचा फटका बसू शकतो. 
 
विराट कोहलीसाठी गेले काही महिने आव्हानात्मक होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटला चांगली कामगिरी करता आली नव्हती. २०२४ मध्ये खेळलेल्या ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहली सहा पैकी पाच सामन्यांमध्ये लेग स्पिनरच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. त्यामुळं विराटवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विराट कोहलीने आपल्या फलंदाजीची रणनीती बदलल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये विराटमी नाबाद शतक केले होते. विराट कोहलीने त्या डावात केवळ चौकार मारले होते. त्याचीच पुनरावृत्ती ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली. 
 
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ९८  बॉलमध्ये ८४ धावांची खेळी केली. या डावात विराटने ५६  सिंगल्स धावा केल्या.धावफलक बदलता राहिला त्यामुळे भारतीय संघावर अधिक दबाव आला नाही.ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराटने केवळ ५ चौकार मारले,५६ सिंगल्स काढल्या तर, चार वेळा २-२ रन धावून काढल्या.
 
विराट कोहली म्हणाला, "ही खेळी पाकिस्तान विरुद्धच्या खेळी सारखीच होती. इथे परिस्थिती समजून घेणे आणि स्ट्राइक रोटेट करणे गरजेचे होते ,या खेळपट्टी भागिदारी महत्त्वाची होती ", असं विराट कोहली म्हणाला. विराट कोहलीच्या आक्रमक खेळी ऐवजी संयमी खेळीने विरोधी संघांची झोप उडाल्याचे दिसून आले. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला.विराट कोहली लयीत असतो त्यावेळी आपण त्यावर दबाव निर्माण करु शकत नाही. त्यामुळं त्याला बाद करणं आवघड होतं. दरम्यान, विराट कोहलीच्या बदललेल्या रणनीतीचा फटका न्यूझीलंडला देखील अंतिम फेरीच्या लढतीत बसू शकतो. विराट कोहली २००० नंतर सर्वाधिक सिंगल्स धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर ५८६८ धावा आहेत. 

Related Articles