अंतिम सामन्याआधी मॅट हेन्रीला दुखापत   

दुबई : भारतीय संघाने तुल्यबळ ऑस्ट्रेलियन संघाला उपांत्य फेरीमध्ये पराभूत करत दिमाखात अंतिम सामन्यामध्ये धडक मारली. त्यापाठोपाठ दुसर्‍या उपांत्यफेरीमध्ये न्यूझीलंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारत फायनलचे तिकीट मिळवले. त्यामुळे आता न्यूझीलंड विरूद्ध भारत असा चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ आपले सर्वोत्तम ११ खेळाडू खेळवण्याचा प्रयत्न करतील आणि विजेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावतील. पण त्याआधी न्यूझीलंडच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. साखळी सामन्यात भारताचे ५ बळी घेणारा स्टार खेळाडू मॅट हेनरी दुखापतग्रस्त झाला असून फायनलमध्ये खेळण्याबाबत साशंक असल्याचे सांगितले जात आहे.
 
मॅट हेनरी बाबत न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले की, आम्ही मॅट हेनरीच्या दुखापतीबाबत लक्ष ठेवून आहोत. काही स्कॅन्स काढण्यात आले आहेत. तो सामन्याच्या दिवसापर्यंत तंदुरूस्त व्हावा यासाठी आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. सध्या आम्ही त्याच्या खेळण्याबाबत काहीही सांगू शकत नाही. त्याचा खांदा दुखावला असल्याने त्याला वेदना होत आहेत. पण आमची अशी अपेक्षा आहे की तो रविवारपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल आणि खेळेल. 
 
भारताविरूद्धच्या साखळी सामन्यात मॅट हेनरीने अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने ८ षटके टाकली होती. त्यात त्याने ४२ धावा देऊन ५ बळी घेतले होते. शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जाडेजा, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी या पाच फलंदाजांना त्याने स्वस्तात माघारी पाठवले होते. तो जर फायनलच्या सामन्यात खेळला नाही तर भारतीय संघाविरूद्ध न्यूझीलंडच्या फलंदाजीची धार बोथट होणयाची शक्यता आहे.

Related Articles