हवाईदलाच्या विमानातून दक्षिण कोरियातील घरांवर पडले बॉम्ब; १५ जण जखमी   

सोल : दक्षिण कोरियामध्ये हवाई दलाकडून मोठी चूक झाली आहे. दक्षिण कोरियात हवाईदलाच्या विमानातून काही घरांवर बॉम्ब पडले आहेत. या बॉम्बचा स्फोट झाल्याने १५ नागरिक जखमी झाले आहेत, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 
 
पोचेऑनमध्ये लष्करी सरावावेळी लष्करी विमानातून बॉम्ब टाकण्यात आले. हे बॉम्ब मानवी वस्तीमध्ये पडल्याने अनेक घरे आणि चर्चचेदेखील नुकसान झाले आहे. या स्फोटानंतर परिसर हादरला. नागरिकांना काहीच कळत नव्हते. उत्तर कोरियाशी वैर असल्याने सुरुवातीला काहींना उत्तर कोरियाकडून हल्ले सुरू झाल्याचे वाटले. परंतु, नंतर आपल्याच देशाच्या विमानातून बॉम्ब टाकण्यात आल्याचे समोर आले. 
   
राजधानी सोलपासून पोचेऑन हे गाव ४० किमी अंतरावर आहे. दक्षिण कोरियाच्या हवाई दलानुसार केएफ-१६ जेट विमानांमधून ५०० पाऊंड  वजनाचे आठ बॉम्ब टाकण्यात आले. हवाई दलाने या घटनेवर खेद व्यक्त केला असून, जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत असे म्हटले आहे. या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व लाईव्ह-फायर प्रशिक्षण स्थगित करण्यात आले आहेत. याच्या चौकशीसाठी एक पथक स्थापन करण्यात आले असून, हवाई दलाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
   
पायलटने केलेली ही चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. बॉम्ब डागण्याच्यावेळी संवादामध्ये झालेल्या चुकीमुळे हे डागलेगेलेले बॉम्ब दुसर्‍याच ठिकाणी पडल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. हा ग्रामीण भाग असल्याने आठ ब़ॉम्ब पडूनही जास्त जिवीतहानी झालेली नाही. या स्फोटात दोन इमारती आणि एक मालमोटार नेस्तनाबूत झाले आहे. एका चर्चचेही नुकसान झाले.

Related Articles