स्वच्छतेच्या नावाखाली मोदी सरकारकडून गंगा मातेची फसवणूक : मल्लिकार्जुन खर्गे   

नवी दिल्ली : ’नमामि गंगे’ योजनेंतर्गत वाटप केलेल्या रकमेपैकी ५५ टक्के रक्कमही खर्च झालेली नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगा स्वच्छतेची हमी विसरले  स्वच्छतेच्या नावाखाली त्यांनी गंगा मातेची फसवणूक केली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी समाज माध्यमाद्वारे केला. 
  
खर्गे म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणाले होते की ’माता गंगा यांनी त्यांना बोलावले आहे’ मात्र, ते गंगा स्वच्छ करण्याची हमी विसरले आहेत. २०१४ मध्ये ’नमामि गंगे’ योजना सुरू करण्यात आली होती. नमामि गंगे योजनेसाठी मार्च २०२६ पर्यंत ४२ हजार ५०० कोटी रुपये वापरायचे होते, परंतु संसदेत दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांवरून असे दिसून येते, की डिसेंबर २०२४ पर्यंत केवळ १९ हजार २७१ कोटीच यावर खर्च झाले आहेत. याचा अर्थ मोदी सरकारने नमामि गंगे योजनेचा ५५ टक्के पैसा खर्च केला नाही.
  
माता गंगाप्रती मोदी सरकारची एवढी उदासीनता का, असा सवाल उपस्थित करत खर्गे म्हणाले, २०१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी आमच्या एनआरआय सहकार्‍यांना ‘स्वच्छ गंगा निधी’मध्ये योगदान देण्याची विनंती केली होती. मार्च २०२४ पर्यंत या निधीसाठी ८७६ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली होती, परंतु त्यातील ५६.७ टक्के निधी अद्याप वापरण्यात आलेला नाही. या निधीतील ५३ टक्के रक्कम सरकारी उपक्रमातून देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  
  
नोव्हेंबर २०२४ मध्ये राज्यसभेत दिलेल्या उत्तरावरून असे दिसून येते की, नमामि गंगेचे प्रकल्पाचे अजूनही ३८ टक्के काम प्रलंबित आहेत. एकूण वाटप केलेल्या निधीपैकी ८२ टक्के सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बांधण्यासाठी खर्च करण्यात येणार होते, परंतु ३९ टक्के एसटीपी अद्याप पूर्ण झालेले नाहीत आणि जे पूर्ण झाले आहेत ते अजूनही कार्यान्वितही नाहीत. नोव्हेंबर २०२४ मध्ये, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पंतप्रधान मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये गंगा नदीची स्वच्छता राखण्यात प्रशासनाच्या अपयशाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, कडक शब्दांत फटकारले होते, आणि  नदीच्या काठावर एक फलक लावण्याची सूचना केली होती. तसेच शहरातील गंगेचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित नसल्याचेही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने सांगितले होते.

Related Articles