बीडमध्ये पिता-पुत्राला अमानुष मारहाण   

भोसले याच्यावर गुन्हा; अटकेसाठी पथके रवाना 

बीड : बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात पिता-पुत्राला अमानुष मारहाण करणार्‍या सतीश भोसले याच्यावर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी असून, तो आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते. सतीश भोसले हा दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये हरीण पकडण्यासाठी गेला होता. त्यावेळी दिलीप आणि महेश या पिता पुत्राने त्यांना अडवले. त्याच रागातून   सतीश भोसले आणि त्याच्या सहकार्‍यांनी दिलीप आणि महेश ढाकणे यांना अमानुष मारहाण केली. या मारहाणीत दिलीप ढाकणे यांचे आठ ते नऊ दात पडले आहेत. तर, महेश ढाकणे यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या मारहाणीची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर सतिश भासले याच्यावर गुन्हा दाखल करून शिरूर पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी पुणे आणि अहिल्यानगर येथे रवाना झाली आहेत, दरम्यान, बाबी ग्रामस्थांनी भोसलेवर गुन्हा दाखल झाला, आता त्याचा आका सुरेश धस यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी केली आहे.
 
सुरेश धस यांनी खुलासा करावा : दमानिया 
 
मारहाणीच्या चित्रफीतीनंतर सतीश भोसलेच्या आणखी काही चित्रफीती समोर आल्या आहेत.एका चित्रफितीमध्ये तो नोटांचे बंडल मोटारीच्या डॅशबोर्डवर टाकताना दिसत आहे. तर दुसर्‍या एका चित्रफितीत तो थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री करत  आहे. तर कधी  एका आलिशान हॉटेलमध्ये व्हिआयपी व्यक्तीसारखा बाथरुमधून बाहेर निघताना दिसत आहे. त्यामुळे सतीश भोसलेकडे एवढा पैसा आला कुठून? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. सुरेश धस यांना तो बॉस आणि माझा विठ्ठल म्हणतो. सरकारही म्हणतो. सुरेश धस यांनी यावर खुलासा करावा. हे सर्व एका माळेचे मनी आहेत, उद्या तो देखील वाल्मिक कराड होईल, अशी टीकाही अंजली दमानिया यांनी केली. 
 
मारहाणीचे समर्थन नाही : धस 
 
सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी त्या मारहाणीचे समर्थन केले नाही. मी सतीश भोसलेला ओळखतो. तो कधी कधी माझ्याकडे येतो. माझ्या मागे तो असे काही उद्योग करतो हे मला माहित नाही. ही घटना दीड वर्षापूर्वीची आहे. त्याच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे.

Related Articles