E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
स्वातंत्र्यसेनानी शिशिरकुमार बोस
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
गाऊ त्यांना आरती,गिरीश चिटणीस
स्वातंत्र्यसेनानी शिशिरकुमार बोस हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, बालरोगतज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञ होते. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अध्वर्यू शरदचंद्र बोस यांचे सुपुत्र आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे जगभरातील प्रसिद्ध नेते सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९२० रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या आई विभावती बोस या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणास्थान. लहानपणापासूनच शिशिरकुमार बोस हे स्वातंत्र्यलढ्यातील संघर्ष बघत बघतच मोठे झाले. १९४१ मध्ये कोलकाता येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांनी त्यांचे काका नेताजी सुभाषचंद्र बोस यांना नजरकैदेतून जाण्यास मदत केली. त्यांना कोलकाता येथील एल्जिन रोडवरील त्यांच्या वडिलोपार्जित घरातून पळून जाण्याची योजना आखण्याच्या सहभागाबरोबरच गुप्तपणे घराबाहेर काढून गाडीतून शेजारच्या बिहार राज्यातील गोमोह रेल्वेस्टेशनपर्यंत सोडले. जिथून सुभाषचंद्र बोस यांनी पेशावरला जाणारी ट्रेन पकडली.
१९४२ मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या ‘भारत छोडो’ चळवळीदरम्यान विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलिसांच्या हल्ल्यात सहभागी असलेले शिशिरकुमार बोस गंभीर जखमी झाले आणि त्यांना कोलकाता येथील तुरुंगात टाकण्यात आले आणि नंतर १९४३ पर्यंत त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्यात आले. नेताजी सुभाचंद्र बोस यांना ब्रिटीशांच्या सीआयडीच्या नजरकैदेतून सुटून जाण्यास मदत केल्याबद्दल ब्रिटीश वसाहतवादी सरकारने पुन्हा अटक केली आणि दुसर्या महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत दिल्लीतील लाल किल्ला, लाहोर किल्ला आणि लायलपुर तुरूंगात दीर्घकाळ एकांतवासात तुरूंगात टाकण्यात आले.
दुसर्या महायुद्धाच्या शेवटी सुटका झाल्यानंतर शिशिरकुमार बोस यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि लंडन, शेफील्ड, तसेच व्हिएन्ना येथे बालरोग शास्त्राचे प्रगत प्रशिक्षण घेतले. शिशिरकुमार बोस यांनी ’सुभाष ड शरद: न इंटिमेट मेमॉयर ऑफ द बोस ब्रदर्स’ या ग्रंथात लिहिले आहे की, मी फक्त नऊ वर्षाचा होतो; पण ती आठवण आजही माझ्या मनात कोरली गेली आहे. संध्याकाळची वेळ होती. वूडबर्न पार्क-कोलकाताच्या पहिल्या मजल्यावरचा जिना एरवीपेक्षा अगदी हळूहळू आणि अत्यंत गंभीर चेहर्याने चढत सुभाषकाका वर आले. पहिल्या मजल्यावरच्या दिवाणखान्यात ते थांबले आणि स्तब्ध उभे राहिले. ते एखाद्या संगमरवरी पुतळ्यासारखे दिसत होते. तेवढ्यात आई विभावती बोस तिथे दिवाणखान्यात आली. त्यांनी तिच्या हातात कागदात गुंडाळलेले एक लहानसे पुडके दिले. भरून आलेल्या आवाजात ते बंगालीत म्हणाले... जतिनदासची थोडीशी रक्षा आणली आहे. जपून ठेवा.
भव्य अंत्ययात्रा
१३ सप्टेंबर १९२९ रोजी जतिंद्रनाथ दास यांचा लाहोरच्या तुरूंगात बासष्ट दिवसांच्या उपोषणानंतर मृत्यू झाला. हे उपोषण स्वातंत्र्यलढ्यातील कैद्यांना अमानुष वागणूक आणि छळ करण्याविरुद्ध होते. जतींद्रनाथ दास (जतिन) हे नेताजींचे बंगालमधील एक जवळचे अनुयायी. त्यांची इच्छा आपला अंत्यसंस्कार पंजाबमधील लाहोर येथे न होता कोलकाता येथे व्हावा अशी होती. जतींद्रनाथ यांचे पार्थिव कोलकात्याला नेण्यासाठी ६०० रुपये खर्च येणार होता. ही रक्कम सुभाषचंद्र बोस यांनी तातडीने पाठवली; पण पंजाबच्या देशभक्तांनी ती रक्कम परत करून तेवढी रक्कम स्वतःच उभी केली. कोलकात्यातल्या जतींद्रनाथ यांच्या भव्य अंत्ययात्रेत नेताजी सर्वात पुढे होते. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या अंत्ययात्रेनंतर कोलकात्यात निघालेली हीच सर्वात मोठी अंत्ययात्रा होती.
रविंद्रनाथ टागोर आणि सुभाषचंद्र बोस यांची शेवटची भेट कोलकात्यात जुलै १९४० मध्ये झाली. त्यांच्या भेटीनंतर केवळ काही तासांत नेताजींना अटक झाली. त्यांच्या राजकीय आयुष्यातील ही अकरावी आणि शेवटची अटक. त्यांना कोलकाता येथील प्रेसिडन्सी तुरूंगात ठेवण्यात आले. त्यानंतर नेताजींनी बेमुदत उपोषण केल्याने पाच महिन्यांनंतर डिसेंबर १९४० मध्ये नेताजींनी ब्रिटीशांना निर्वाणीचे सांगितले होते.. ’मला सोडून द्या, नाहीतर मी जगणंच नाकारेन’. त्यामुळे सावध होत ब्रिटीश सरकारने नाईलाजाने त्यांना सोडून दिले; पण त्यांना त्यांच्या एल्जिन रस्त्यावरच्या बोसांच्या वडिलोपार्जित घरात स्थानबद्ध केले होते. त्यांच्यावर रात्रंदिवस ब्रिटीश शासनाची करडी नजर होती. जमेल तितक्या लवकर नेताजींच्या तब्बेतीत सुधारणा झाल्यावर पुन्हा त्यांना अटक करण्याचा ब्रिटीश सरकारचा बेत होता. डिसेंबर १९४० या महिन्याच्या सुरुवातीलाच नेताजींनी २० वर्षांचा पुतण्या शिशिरकुमारकडे भारतातून निसटून जाण्यासाठी मदत मागितली. दोघे मिळून कोलकात्यातून निसटायची योजना आखत असताना अशा इतर ऐतिहासिक पलायनांविषयी वाचणे उपयुक्त ठरेल, असे शिशिरकुमार यांना वाटले. त्यामध्ये विशेषतः १९१९ मध्ये इंग्लंडमधल्या लिंकन शहरातून एमन द व्हलेरा यांनी केलेल्या पलायनाविषयी, ज्या योजनेत मायकेल कॉलिन्सदेखील सहभागी होते, त्याचे वाचन शिशिरकुमार यांनी केले.
नेताजींनी डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात अकबर शाह यांना कोलकात्यावरुन बद्राशीला (पेशावर जवळील गाव) तार केली ’रीच कलकत्ता’. अतिशय गुप्तपणे अकबर शाह नेताजींच्या घरी पोहोचले. नेताजींनी डिसेंबर - जानेवारीमध्ये दाढी वाढविली. कपडे आणण्यासाठी शिशिरकुमार बोस आणि अकबर शाह बाजारपेठेत गेले आणि अकबर शाह यांनी कपडे खरेदी केले. त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडताना मुद्दामच कपड्याचे पुडके गाडीत विसरल्याचे नाटक करीत शोफरला समजू नये, अशी व्यवस्था केली आणि हे कपडे नेताजींपर्यंत पोहोच झाले. १७ जानेवारी रोजी पहाटे १.३० वाजता शिशिरकुमार बोस यांनी ३८/२ एल्जिन रस्त्यावरच्या आपल्या वडिलोपार्जित घरातून आपल्या काकांना गाडीतून गोमोह स्थानकावर सोडले. कोलकात्याहून ते अंतर ३२० किलोमीटर होते, तर बिहारमधल्या धनबादपासून (आता ते झारखंडमध्ये आहे) चाळीस किलोमीटर दूर होते. दुसर्या दिवशी रात्री नेताजींनी तिथून दिल्ली-कल्का मेल पकडली आणि त्यानंतर ’फ्रंटियर मेल’ने ते पेशावरला गेले. पेशावरला मियां अकबर शाह यांनी त्यांना रेल्वे स्टेशनवरुन एक दिवस ताजमहाल हॉटेलमध्ये ठेवून त्यानंतर अबद खान यांच्या घरी राहण्याची व्यवस्था केली. पुढे काबूलच्या प्रवासाची सोयही लावून दिली. १७ जानेवारी १९४१ रोजी रात्रीतून गाडीने कोलकात्याला जाताना काका-पुतण्या अखंड एकमेकांशी बोलत होते. ही गाडी १९३७ सालची जर्मन बनावटीची वाँडरर कार होती. ती आता कोलकाता येथील नेताजी भवनमधल्या गाडी रस्त्यावर प्रदर्शनात मांडली आहे.
तुरुंगवासाची शिक्षा
बोलता बोलता मध्येच एकदा नेताजींनी शिशिरला विचारले, दे व्हलेरांच्या १९१९ सालच्या सुटकेविषयी तुला काही ठाऊक आहे का? शिशिर हे ऐकून चकीत झाले. आपल्याला त्याविषयी माहीत आहे असे उत्तर देत त्यांनी थोडक्यात ती कहाणी नेताजींना सांगितली. याची नोंद ’सुभाष अँड शरद’ या पुस्तकात आहे. शिशिरकुमार यांची नेताजींबरोबरची ही शेवटची भेट. अकबर शाह, तसेच अबद खान यांना तुरुंगवासाची शिक्षा या योजनेतील सहभागाबद्दल भोगावी लागली. दोघांचेही अतोनात हाल करण्यात आले. ज्या गोमोह स्थानकावर शिशिरकुमार यांनी नेताजींना सोडले त्याचे नांव आता ’नेताजी सुभाषचंद्र बोस गोमोह जंक्शन’ असे आहे. आधीपासून काळजीपूर्वक रचलेल्या योजनेनुसार रविवार दिनांक २६ जानेवारी १९४१ रोजी नेताजी एल्जिन रस्त्यावरच्या घरातून नाहीसे झाल्याची बातमी कोलकात्यात सगळीकडे पसरवण्यात आली. यापूर्वी ते एकांतवासात गेलेले असून, कोणालाही भेटत नाहीत, असे जाहीर करण्यात आले होते. अशा प्रकारे फक्त शिशिरकुमार, त्यांचे वडील शरदचंद्र, आई विभावती आणि चुलत बहीण ईला एवढ्याच लोकांना १७ जानेवारी १९४१ रोजी पहाटे १.३० वाजता गुप्तपणे नेताजी निसटून गेल्याचे ठाऊक होते. २७ जानेवारी रोजी पोलीस घरी आले आणि माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत ब्रिटिश पोलिसांच्या कचाट्यातून ते केव्हाच बाहेर पडले होते. ३१ जानेवारी १९४१ रोजी ते काबूलमध्ये पोहोचले, साधारण १७ मार्चच्या सुमारास इटालियन दूतावासाच्या मदतीने त्यांनी अखेर काबूल सोडले आणि सोव्हिएत युनियनमार्गे एप्रिलच्या सुरुवातीला नेताजी बर्लिनमध्ये दाखल झाले.
ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचे विमान अपघातात निधन झाले, तेव्हा शिशिरकुमार बोस तुरूंगातच होते. लाहोर किल्ल्यावर साडेतीन महिन्याचा एकांतवास, त्यानंतर पंजाबमधल्याच लैलापूर तुरूंगात साडेसात महिने तुरूंगवास, ऑक्टोबर १९४४ मध्ये कोलकात्याहून पंजाबला नेताना वाटेत सुमारे दहा दिवस लाल किल्ल्यावरच्या तळघरातल्या कोठडीत तुरुंगवास अशा अनेक यातना शिशिरकुमार बोस यांना भोगाव्या लागल्या. सप्टेंबर १९४५ मध्ये शिशिरकुमार बोस यांना पंजाबातील तुरूंगातून सोडण्यात आले. शिशिर बोस आत्मचरित्रात लिहितात... सुभाषकाकांच्या एकोणपन्नासाव्या वाढदिवशी म्हणजे २३ जानेवारी १९४६ रोजी कोलकात्यात प्रचंड मोठी मिरवणूक निघाली. आझाद हिंद सेनेचे शूरवीर शाह नवाझ खान यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही मिरवणूक शहराच्या दक्षिणेकडून देशप्रिय पार्कपासून ते उत्तरेकडच्या देशबंधू पार्कपर्यंत गेली. सगळे कोलकाता शहरच रस्त्यावर आलेले दिसत होते. मीही त्या गर्दीत सामील झालो आणि संपूर्ण अंतर त्यांच्याबरोबर चालत गेलो.
नेताजी भवन
९ डिसेंबर १९५५ रोजी शिशिरकुमार बोस यांचा कृष्णा चौधरी यांच्याशी विवाह झाला. १९५७ मध्ये नेताजी भवन इथे शिशिरकुमार बोस आणि कृष्णा बोस यांनी नेताजी संशोधन केंद्र (नेताजी रीसर्च ब्यूरो - एनआरबी) स्थापन केले. १९०९ मध्ये तीन मजली भव्य इमारत जानकीनाथ बोस म्हणजेच नेताजींच्या वडिलांनी बांधलेली, १९४६ मध्ये शरदचंद्र बोस यांनी ’नेताजी भवन’ या नावाने देशाला अर्पण केली. या भवनामध्ये नेताजी सुभाष यांच्या स्मृती जतन केल्या जातील आणि त्यांच्या राजकीय वारशाचा आणि विचारसरणीचा प्रचार केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले; मात्र १९५० मध्ये वयाच्या केवळ साठाव्या वर्षी शरदचंद्र बोस यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचे हे कार्य पुढे नेण्याच्या दृष्टीने फारसे काही घडले नाही; पण अखेर १९५५ पासून याची सुरुवात करण्यात आली. शिशिर बोस आणि कृष्णा बोस यांनी नेताजींच्या विशाल आणि गुंतागुंतीच्या आयुष्यावर पद्धतशीरपणे संशोधन करून त्यांचे एकत्रित दस्तऐवज जगभर फिरून तयार केले. १९६१ मध्ये जवाहरलाल नेहरू, १९६९ मध्ये इंदिरा गांधी यांच्यापासून ते २००७ मध्ये जपानचे शिन्झो आबे आणि २०१८ मध्ये बांगलादेशच्या शेख हसीना यांच्यापर्यंत सर्वांनी या भवनाला भेटी दिल्या आहेत.
’नेताजी रीसर्च ब्यूरो’ या केंद्रात नेताजींच्या संघर्षात त्यांना साथ देणार्या भारतभरातील आणि जगभरातील लोकांची एकत्र यायची जागा निर्माण झाली. इथे येणार्या लोकांमध्ये ’आझाद हिंद सरकार’चे आघाडीचे सदस्य, तसेच एस.ए. अय्यर प्रेम आणि लक्ष्मी सहगल, जी.एस. धिल्लन आणि अबिद हसन यासारख्यांचा समावेश होता. सन १९४२ मध्ये सिंगापूर येथे ’आयएनए’ (इंडिया नॅशनल आर्मी) निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावणारे आणि आयुष्यभर भारताचे स्नेही राहिलेले जनरल फुजिवारा ईवाईची जपानी लष्करी अधिकारी १९६७ पासून १९८६ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत इथे येत असत. यामध्ये लिभोनार्ड गॉर्डन आणि जॉइस लेब्रा या अमेरिकन विद्वानांचाही समावेश होता. १९८२ ते १९८७ पर्यंत शिशिरकुमार बोस पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्य होते. त्यांच्या पत्नी कृष्णा बोस एक प्राध्यापक आणि लेखिका, ग्रेटर कोलकात्याच्या जाधवपूर मतदारसंघातून तीनवेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांचा मुलगा सुभंत बोस आता पुढील कार्य करीत आहे. ३० सप्टेंबर २००० रोजी शिशिरकुमार बोस यांचे निधन झाले, तर कृष्णा बोस यांचे २०२० मध्ये निधन झाले. शिशिरकुमार यांच्या मृत्यूनंतर नेताजी भवनाशेजारील रस्त्याचे नाव शिशिरकुमार बोस असे ठेवण्यात आले.
Related
Articles
भर रस्त्यात विकृत कृत्य करणार्याची मित्रासह धिंड
11 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
विजयाच्या जल्लोषावेळी पोलिसांच्या मोटारीवर नृत्य
11 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
भर रस्त्यात विकृत कृत्य करणार्याची मित्रासह धिंड
11 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
विजयाच्या जल्लोषावेळी पोलिसांच्या मोटारीवर नृत्य
11 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
भर रस्त्यात विकृत कृत्य करणार्याची मित्रासह धिंड
11 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
विजयाच्या जल्लोषावेळी पोलिसांच्या मोटारीवर नृत्य
11 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
भर रस्त्यात विकृत कृत्य करणार्याची मित्रासह धिंड
11 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
विजयाच्या जल्लोषावेळी पोलिसांच्या मोटारीवर नृत्य
11 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
3
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
4
येमेनजवळ चार नौका बुडून १८६ जण बेपत्ता
5
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा
6
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले