कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार   

पुणे : राज्यातील बहुतांश भागात कमाल आणि किमान तपमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने मंगळवारी दिला. राज्यात काल अकोला येथे उंचाकी ३८.८ अंश कमाल तपमानाची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून कोकणात उष्ण व दमट वातावरण आहे. त्यामुळे मागील आठवड्यात कोकणात उष्णतेची लाट होती. विदर्भातही कोरड्या हवामानामुळे उष्णतेची लाट येणार असल्याने या दोन्ही भागांना यलो अलॅर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पुढील पाच दिवस हवामान कोरडे असणार आहे. येत्या चार दिवसांत राज्यातील कमाल आणि किमान तपमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
मागील २४ तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तपमानात लक्षणीय वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तपमान सरासरीच्या जवळपास होते. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली. उर्वरित राज्यात किमान तपमान सरासरीच्या जवळपास होते. दोन दिवसांनंतर कोकण आणि विदर्भातही कोरडे हवामान असणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 
  
पुण्यातील तपमानही वाढले
 
• पुणे शहर आणि परिसरातील कमाल आणि किमान तपमानात वाढ झाली आहे. काल पुण्यात ३७ अंश कमाल, तर १७.४ अंश किमान तपमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत किमान तपमानात १ ते २ अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. शहरात पुढील आठवडाभर आकाश मुख्यत: नीरभ्र असणार आहे. हवामान कोरडे राहणार असल्याने दिवसभर ऊन आणि उकाडा जाणवणार आहे. रात्रीच्या किमान तपमानात वाढ होत असल्याने रात्रीही उकाडा जाणवत आहे. वाढलेले ऊन आणि उकाड्यामुळे पुणेकरांना फॅन, कुलर, एसीचा वापर करावा लागत आहे.

Related Articles