सुरेश धस मुंडेंना भेटल्याने खळबळ   

साडेचार तास बैठक; उघड झाल्यावर सारवासारव

मुंबई,  (प्रतिनिधी) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण आक्रमकपणे लावून धरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणणार्‍या भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची चार दिवसांपूर्वी मुंबईत गुप्त भेट झाली असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. एका खासगी रुग्णालयात धस आणि मुंडे  यांची भेट झाली. मुंडे यांच्या कार्यालयाने सुरुवातीला याचा इन्कार केला, पण नंतर स्वतः धस यांनी भेट झाली असल्याची कबुली देताना, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचे सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणल्याची आपली माहिती असून हे अतिशय गंभीर असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
 
संतोष देशमुख हत्याप्रकरण गेले दोन महिने महाराष्ट्रात गाजत आहे. धस यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरले होते. त्याच धस यांनी एका खासगी रुग्णालयात मुंडे यांची भेट घेतल्याचे वृत्त एका वाहिनीने दिल्यानंतर खळबळ उडाली. 
 
मुंडे यांच्या डोळ्याची मागच्या आठवड्यात शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर धस रुग्णालयात जाऊन भेटले. नंतर त्यांच्या निवासस्थानी सुद्धा भाजप बावनकुळे यांच्या उपस्थितीत भेट झाली असल्याचे समजते. 
 
धस यांनी मुंडे यांची भेट घेतल्याचे मान्य केले. डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो. लपून-छपून नाही, तर उघडपणे भेटलो. नंतर त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, तर त्यात गजहब करण्यासारखे काय आहे? असा सवाल  धस यांनी केला. मुंडे यांच्या सोबत काहीही चर्चा झाली नाही. फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि मी निघून आलो, असाही दावा त्यांनी केला. मी कधीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांचाच राजीनामा त्यांच्या पक्षाचेच लोक आणि इतर राजीनामा मागत आहेत. त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हे सर्वस्वी अजित पवार यांच्या हातात आहे. लढा सुरूच राहणार, असेही धस यांनी स्पष्ट केले.

दमानियांकडून संताप

या भेटीच्या वृत्तावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. मला चार ते पाच दिवसांपूर्वी दोघांची भेट झाली असल्याची कुणकुण लागली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली, असे कळले आहे. अशी भेट झाली असेल तर फार दुर्दैवी आहे. आता धस त्यांच्याविरोधात लढतील की नाही? आकाचा आका आहे वगैरे बोलत होते. आताच्या घडीला हे समोर येत असेल तर कठीण आहे. हे अतिशय चुकीचे आहे, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

मतभेद आहेत; मनभेद नाहीत 

चंद्रशेखर बावनकुळे यांनीही धस-मुंडे भेटीला दुजोरा दिला. आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो, धस आणि मुंडे यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाहीत. जे मतभेद आहेत, ते दूर होतील, असेही बावनकुळे म्हणाले. धनंजय मुंडे यांनी भाजपमध्ये असताना माझ्यासोबत काम केले आहे, असेही ते म्हणाले. 
 

Related Articles