मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट   

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यासंदर्भातील गुरुवारी सायंकाळी गृह मंत्रालयाने अधिसूचना काढली. तशी शक्यता दोन दिवसांपासून वर्तविली जात होती. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी याबाबत शिफारस केली होती.मणिपूरमधील वांशिक हिंसाचारावरून  एन. बिरेन सिंग यांच्यावर सातत्याने टीका केली जात होती. सिंग यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे सिंग यांनी ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. सिंग यांच्या राजीनाम्यानंतर अंदाजपत्रकी अधिवेशन रद्द करण्यात आले होते. दुसरीकडे, राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यातच, भाजपचे नेतृत्व मुख्यमंत्री पदाची धुरा कोणाकडे सोपवावी, याबाबत निर्णय घेऊ शकले नव्हते. दरम्यानच्या काळात मणिपूरचे प्रभारी संबित पात्रा यांनी भाजपच्या काही आमदारांसोबत बंद दाराआड चर्चा केली होती. तसेच, राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची दोन वेळा भेटदेखील घेतली होती.
 
भाजप आमदार करम श्याम यांनी चोवीस तासांपूर्वीच मणिपूरमध्ये कोणतेही घटनात्मक संकट नाही, असा  दावा नुकताच केला होता. मणिपूरमधील समस्या केंद्र सरकार आमदारांच्या मदतीने सोडवेल, असे ते म्हणाले होते. पण, राष्ट्रपती राजवटीबाबत मला काही माहीत नाही, असेही त्यांनी सांगितले होते. मणिपूरमध्ये मे २०२३ पासून वांशिक हिंसाचार घडत आहे. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
 
मणिपूरच्या राज्यपालांकडून प्राप्त शिफारशीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला. राज्यघटनेच्या कलम ३५६ नुसार ज्यावेळी राज्यातील सरकार घटनात्मक स्वरूपात कामकाज करण्यास असफल होते. तेव्हा त्या राज्यातील नियंत्रण केंद्र सरकारकडे सोपवले जाते. त्यानुसार, राज्यातील सर्व अधिकार आता केंद्राकडे सोपविण्यात येत आहेत.

Related Articles