संमेलन आयोजक संस्था व साहित्य महामंडळात समन्वयाचा अभाव   

आयोजक संस्थेच्या कार्यक्रमापासून साहित्य महामंडळ अनभिज्ञ

पुणे : दिल्ली येथे होणार्‍या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त आयोजक सरहद संस्था अनेक कार्यक्रम घेत आहे. मात्र, या सर्व कार्यक्रमांपासून साहित्य महामंडळ अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे. दोन्ही संस्थांमधील समन्वयाच्या अभावामुळे संमेलनाच्या नियोजनावर परिणाम होत आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी खरे तर साहित्य महामंडळ आणि आयोजक संस्था यांच्यात समन्वय असणे नितांत गरजेचे आहे. मात्र, आयोजक संस्था पुण्याची आहे. संमेलन दिल्लीत होणार असून साहित्य महामंडळाचे कार्यालय मुंबई साहित्य संघाकडे आहे. त्यामुळे नियोजित कार्यक्रम आणि नियोजनाबाबत साहित्य महामंडळ आणि आयोजक संस्थेत कसलाच ताळमेळ नसल्याचे नुकत्याच दिल्लीतील गौरव समारंभावरून स्पष्ट झाले आहे. सरहद संस्थेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावरून वाद सुरू झाला आहे. तर साहित्य महामंडळाने या कार्यक्रमाची आयोजकांनी आम्हाला कसलीच माहिती दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. 
 
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिल्याने त्यावर उद्धव ठाकरे शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. तर साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी ‘या कार्यक्रमाविषयी आम्हाला काहीच माहिती नाही. आयोजक संस्थेनेही या कार्यक्रमाची साहित्य महामंडळाला माहिती दिली नाही.’ असे सांगून त्यांनीही हात वर केले आहेत. संमेलन अगदी आठवडाभरावर आले असतानाही दोन महत्त्वाच्या घटकांत समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिल्लीतील संमेलन आणि नियोजनाबाबत साहित्य वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. संमेलनाच्या तारखा जाहीर झाल्यापासून आयोजक संस्थेने अनेक कार्यक्रम घेतले आहेत. यातील दोन ते तीन कार्यक्रम वगळता इतर कार्यक्रमांना साहित्य महामंडळाचे (मुंबईतील) पदाधिकारी गैरहजर होते. समन्वयाअभावी गोंधळ निर्माण होत असून साहित्य क्षेत्रात चुकीचा संदेश पसरत आहे. त्यामुळे येत्या काळात तरी साहित्य महामंडळ आणि आयोजक संस्था समन्वय साधणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
 
सर्व कार्यक्रम आयोजक संस्थेचे 
 
दिल्लीत जो काही पुरस्काराचा कार्यक्रम झाला, त्याबाबत काही महामंडळाला माहीत नव्हते. तो आयोजक संस्थेचा कार्यक्रम होता. संमेलन उद्घाटनाच्या आधी जे काही कार्यक्रम होतात. ते आयोजक संस्था घेत असते. त्या कार्यक्रमांशी साहित्य महामंडळाचा काहीही संबंध नसतो. आधीच्या कार्यक्रमांना महामंडळाची परवानगी घेणे किंवा कळविणे असे काही बंधन नाही. 
- प्रा. उषा तांबे, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

Related Articles