पीएमपी तोट्यातच!   

मागील दहा वर्षात सातपटीने वाढून ७६६ कोटी ८४ लाखांवर

पुणे: शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत महत्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या पीएमपीचा तोटा दरवर्षी वाढतच चालला आहे. मागील दहा वर्षात हा तोटा सातपटीने वाढून ७६६ कोटी ८४ लाखांवर पोहोचला आहे. भाडे दरवाढ नाही, पासेसची विक्री घटणे आणि कर्मचार्‍याच्या वेतनासह अन्य कारणांमुळे तोटा वाढतच चालला आहे. 
     
पुणे, पिंपरी चिंचवड आणि शहरालगतच्या ग्रामीण भागामध्ये वाहतूक सुविधा पुरविणार्‍या पीएमपीचा तोटा ७६६ कोटी ८४ लाख रुपयांवर पोहोचला आहे. २०१४-१५ मध्ये पीएमपीला ९९ कोटी ४४ लाख रुपये तोटा झाला होता. कंपनी स्थापनेनंतर संचलनातील तूटीपोटी महापालिका तोट्याची ६० टक्के तर पिंपरी चिंचवड महापालिका ४० टक्के भरपाई करून पीएमपीला टेकू देत आली आहे. तर पीएमआरडीएच्या स्थापनेनंतर मागील वर्षीपासून पीएमआरडीएने देखिल तुटीपोटी काही हिस्सा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार २०२५-२६ मध्ये महापालिकेला सुमारे ४०० कोटी रुपये इतकी संचलनांतील तूट भरून देण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी लागणार आहे.
 
पीएमपीच्या तूटीची कारणे
 
तिकीट विक्री व पास उत्पन्नामध्ये घट. कोणत्याही प्रकारची तिकिट अथवा पास दरवाढ नाही. तपासणी पथके सक्षम नाहीत. प्रति कि.मी. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मिळणार्‍या पासेसच्या उत्पन्नात घट. उत्पन्न, खर्च, उत्पादीत धाव, स्थायी खर्चामध्ये कोणतीही बचत नाही. यामुळे तुटीमध्ये ६ टक्के वाढ. सेवकांवरील वेतन खर्च वाढत आहे. बसचे २१ लाख ६० डेड (अनुउत्पादक) कि.मी. रनिंगमुळे २४ कोटी ६८ लाख रुपये नाहक खर्च. आयुर्मान वाढलेल्या बस बंद पडत असल्याने रस्त्यावरील बसची संख्या कमी.
 
तूट कमी करण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजना
 
उत्पन्नातील गळती कमी करण्यासाठी तपासणी पथकांचे सक्षमीकरण करणे. शास्त्रीय पद्धतीने तिकीट व पास दराचा अभ्यास होणे गरजेचे. बसचा डेड किलोमीटर खर्च कमी करणे. वारंवार बंद पडणार्‍या बसबद्दल योग्य तो निर्णय घेणे.  जास्तीत जास्त बस मार्गावर उपलब्ध करणे. पीएमपीच्या मालमत्तांचा उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून काटेकोरपणे व्यावसायीक वापर करणे. मार्गांची फेररचना करून तुटीतील मार्ग बंद करणे.  
 

Related Articles