ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन   

छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा.रं. बोराडे यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सेंट्रल नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बोराडे यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात  उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पाचोळा या कादंबरीमुळे त्यांना ’पाचोळा’कार म्हणून साहित्यिक वर्तुळात ओळख मिळाली होती. मागील आठवड्यातच राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. बोराडे यांनी पाचोळा, आमदार सौभाग्यवती, मळणी, रहाटपाळणा अशा साहित्यकृतींनी साहित्याचे दालन समृद्ध केले. त्यांच्या चारापाणी या कादंबरीला १९९० चा मराठवाडा साहित्य परिषदेचा कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला होता. दहावीत असताना १९५७ मध्ये त्यांची ‘वसुली’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली होती.
 
बोराडे यांचे ‘मळणी’, ‘कणसं आणि कडबा’, ‘नातीगोती’, ‘माळरान’, ‘बोळवण’, ‘राखण’ हे कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांनी ‘फजितगाडा’, ‘खोळंबा’, ‘ताळमेळ’, ‘हेलकावे’ या कथासंग्रहाद्वारे विनोदी कथालेखन केले.  ‘कशात काय अन् फाटक्यात पाय’, ‘चूकभूल घ्यावी द्यावी’, ‘हसले गं बाई फसले’, ‘बंधमुक्ता’, ‘चोरीचा मामला’, ‘मी आमदार सौभाग्यवती’, ‘मलाच तुमची म्हणा’ या नाटकांतून त्यांनी वैविध्यपूर्ण विषय रंगभूमीवर आणले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य ते अध्यक्ष, ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष, १९८९ मध्ये हिंगोली येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आदी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. 

Related Articles