टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे ओडिशाचे उत्पादक हवालदील   

कटक : ओडिशात टोमॅटोे दर प्रचंड घसरले आहेत. पर्यायाने ते ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध होत आहेत. मात्र, गंजम जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांचे धाबे दणाणले आहे.शेतकर्‍यांकडील टोमॅटो दर प्रति किलो मागे ३ ते ५ रुपयांनी घसरले आहेत. बाजारात तो दहा ते १५ रुपये किलो दराने विक्रीस उपलब्ध आहेत. दर कोसळल्यामुळे किमान उत्पादन खचर्ं देखील निघणार नसल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पण नाईलाजाने टोमॅटो  कमी दरात विकणे त्यांना भाग पडत आहे. अनेकांनी हाताशी आलेले पीक नष्ट केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मेहतन करुन टोमॅटोचे उत्पादन शेतकर्‍यांनी घेतले. त्यासाठी वेळ आणि पैसा ओतला. आता बाजारात विकून फायदा घ्यावा अशा स्थितीत शेतकरी होते. मात्र, दर कोसळल्यामुळे त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे, अशी व्यथा उत्पादक सुरथ पाहन यांनी व्यक्त केली. ते गंजम विभागातील सत्रूशॉलचे रहिवासी आहेत. 
 
ते म्हणाले, आमच्या परिसरात २ रुपये किलो एवढा दर मिळत आहे. त्यामुळे अनेकांन टोमॅटो विकण्यापेक्षा ते फेकून देणे पसंद केले. अनेकांनी एकरात लागवड केली. नफा सोडा, किमान उत्पादन खर्चही हाती लागलेला नाही. बि बियाणे, खते, किटकनाशके आणि वाहतुकीचा खर्चही निघत नाही, अशी खंत मठ मुकुंदपूरचे उत्पादक दिया प्रधान यांनी व्यक्त केली. आम्ही टोमॅटो गुराढोरांना खायला घातले आहेत, असे उपेंद्र पोलाई यांनी सांगितले.
 
गंजम जिल्ह्यात यंदा टोमॅटोचे प्रचंड पीक आले आहे. त्यामुळे दर कोसळण्यामागे ते एक मोठे कारण आहे. गेल्या आठवड्यांपासून दर घसरत चालले होते. टोमॅटो हंगामी पीकात मोडतो. अनेकजण तशी लागवड देखील करतात. यंदाच्या हंगामात सुमारे १ हजार ५०० हेक्टरमध्ये उत्पादन घेतले गेले. उत्पादन वाढले. बाजारात आले आणि दर मिळणे अवघड गेले.
- कांड जेना, उपसंचालक, फलोत्पादक विभाग
 
प्रक्रिया उद्योगांसह शीतगृहांची मागणी 
 
टोमॅटोचे उत्पादन मोठे होते. पण, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आणि त्यांची साठवणूक आणि ते नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठीं शीतगृहे या परिसरात नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना केवळ बाजारात टोमॅटो  विकावा लागतो. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे, अशी खंत उत्पादक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य वृदांवन खाटेई यांनी व्यक्त केली.

Related Articles