कॅरिबियन समुद्रात भूकंपाचा जोरदार धक्का   

त्सुनामीचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील केमन बेटांच्या नैऋत्येस कॅरिबियन समुद्रात भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल एवढी होती. होंडुरासच्या उत्तरेला आणि केमन बेटांच्या नैऋत्य भागात हे धक्के जाणवले.स्थानिक वेळेनुसार शनिवारी सायंकाळी ६.२३ वाजता हा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू केमन बेटांमधील जॉर्ज टाउनपासून १३० मैल नैऋत्येस होता. तर खोली १० किलोमीटरपर्यंत होती. किनारपट्टीजवळील नागरिकांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.  
  
अमेरिकेच्या राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी केंद्राने म्हटले आहे की, अमेरिकेच्या मुख्य भूभागावर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही; पण प्यूर्टो रिको आणि यूएस व्हर्जिन बेटांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. धोका व्यवस्थापन केमन बेटांनी किनार्‍याजवळील रहिवाशांना आतल्या भागात आणि उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. समुद्राच्या लाटा ०.३ ते १ मीटर उंचीपर्यंत असण्याची शक्यता आहे.डोमिनिकन सरकारनेही त्सुनामीचा इशारा जारी केला असून, किनार्‍यावर राहणार्‍या रहिवाशांना समुद्रसपाटीपासून २० मीटरपेक्षा जास्त आणि जमिनीच्या आत २ किलोमीटर अंतरावर उंच भागात जाण्याचा सल्ला दिला. तसेच पुढील काही तास जहाजांना समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles