काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव   

नवी दिल्ली  विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा दारुण पराभवास सामोरे जावे लागले आहे. सलग तिसर्‍यांदा काँग्रेसला एकाही  जागेवर विजय मिळविता आलेला नाही. त्यामुळे, काँग्रेससाठी दिल्ली अभी दूर है... असे म्हटले जात आहे.दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उतरविले होते. मात्र, एकाही उमेदवारास विजय मिळविता आलेला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री, दिवंगत शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित,  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव, अलका लांबा यांनादेखील पराभवाची धूळ चाखावी लागली आहे.
 
दीक्षित नवी दिल्ली मतदारसंघातून तर लांबा कालकाजी मतदारसंघातून रिंगणात होत्या. नवी दिल्ली मतदारसंघात भाजप उमेदवार परवेश वर्मा विजयी झाले. तर, कालकाजीमध्ये ‘आप’च्या उमेदवार आतिशी यांनी विजय मिळविला.देवेंद्र यादव हे बादली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपने उमेदवार अहीर दीपक चौधरी, ‘आप’ने अजेश यादव तर काँग्रेसने देवेंद्र यादव यांना उमेदवारी दिली होती. तिरंगी लढतीत चौधरी यांनी १५,१६३ मतांनी  बाजी मारली. चौधरी यांना ६१,१९२, अजेश यादव ४६,०२९, तर देवेंद्र यादव यांना ४१,०७१ मते मिळाली.  केंद्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली होती. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष ‘इंडिया’ आघाडीचा भाग होते. त्यांनी सार्वत्रिक निवडणूक एकत्रित लढवली होती. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीस ते स्वतंत्रपणे सामोरे गेले. पण, अनेक ठिकाणी काँग्रेसमुळे ‘आप’चे उमेदवार कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले.  शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९९८ ते २०१३ या कालावधीत सलग तीन वेळा सत्ता स्थापन केली होती. मात्र, मागील एक तपापासून काँग्रेस सत्तेबाहेर आहे. विशेष म्हणजे, २०१५, २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. यंदाही काँग्रेसच्या पारड्यात एकही जागा आलेली नाही. आता काँग्रेसला आणखी पाच वर्षे तरी सत्तेसाठी वाट पाहावी लागणार आहे.

Related Articles