रस्ते साफसाईच्या तीन निविदा एकाच ठेकेदाराला   

४० किलोमिटरचे रस्ते सफाईसाठी होणार २०० कोटी खर्च

पुणे: शहरातील चार झोनमधील १८ मीटरच्या वरील ४० किलोमिटरचे रस्ते यांत्रिक पध्दतीने स्वच्छ करण्यासाठी ५.७५ टक्के अधिक दराने निविदा आल्या आहेत. घनकचरा विभागाने १६० कोटी रुपयांची काढलेल्या निविदा अधिक दराने आल्या  सुमारे १७२ कोटी रुपये खर्च होणार आहे. याला स्थायी समतीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तीन निविदा एकाच ठेकेदाराला मिळाल्या एकच दर आला आहे. तर एक निविदा अन्य ठेकेदाराला मिळाली आहे. मागीलवर्षी या कामासाठी काढलेल्या निविदा ३५ टक्के अधिक दराने आल्याने त्या रद्द करण्यात आल्या होत्या. घनकचरा विभागाने प्रचलित दराचा अभ्यास करून फेरनिविदा काढताना या कामाचे एस्टीमेट प्रति किलोमीटरसाठी ३१३ रुपयांनी वाढविण्यात आले आहे.
        
स्थायी समितीमध्ये मंजूर झालेल्या चार झोनच्या निविदांपैकी झोन एकचे काम बी.व्ही.जी. इंडिया लि. कंपनीला मिळाले असून झोन क्र.२,३ आणि ४ चे काम मुंबईतील मे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट सेल प्रा.लि. या कंपनीला मिळाले आहे.मागील काही वर्षांपासून शहरातील रुंदीने मोठ्या असलेल्या रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने सफाई करण्यात येते. महापालिकेच्या पाचही झोनमधील रस्त्यांच्या सफाईच्या कामासाठी पुर्वी दोन निविदा काढल्या होत्या. त्यापैकी एका ठेकेदाराकडे एका झोनचे काम होते तर उर्वरीत चार झोनचे काम दुसर्‍या ठेकेदाराकडे होते. चार झोनचे काम असलेला ठेकेदार दिवाळखोर झाल्याने फेब्रुवारीपासून त्याचे काम बंद झाले आहे. त्यामुळे मागील आठ महिन्यांपासून चार झोनमधील रस्त्यांचे काम महापालिका कर्मचारी करत आहेत.
      
घनकचरा विभागाने तीन महिन्यांपुर्वी प्रचलित दराने चार झोनसाठी निविदा प्रक्रिया राबविली. फक्त रस्ते सफाईच्या कामासोबतच जेटींग मशीनने डिव्हायडर आणि पदपथही स्वच्छ करण्याचा यामध्ये समावेश करत प्रति किलोमीटरसाठी १ हजार २३ रुपये खर्चाचे पुर्वगणपत्रक करून निविदा मागविल्या. या निविदा ३५ टक्के अधिक दराने आल्या. त्यामुळे प्रशासनाने निविदा रद्द करत फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुन्हा रिइस्टीमेट करण्यात आले. नव्या एस्टिमेटनुसार प्रति कि.मी.साठी १ हजार ३३९ रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. तसेच पुढील प्रत्येकवर्षी सहा टक्के दरवाढ केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सात वर्षांमध्ये हा खर्च साधारण २०० कोटी रुपयांपर्यंत होणार आहे.
       
यासंदर्भात घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यानी माहिती दिली, की आताच्या निविदेत पदपथांचा समावेश करण्यात आला आहे. चारही झोनमधील साधारण १० कि.मी.च्या रस्त्यांची नियमीत स्वच्छता होणार आहे. प्रशासनाने पहिल्या निविदेत महापालिकेने दिलेला पुर्वीचाच दर दिला होता. परंतू नवीन निविदेत पिंपरी चिंचवड, नवी मुंबई आणि बृहनमुंबईमध्ये सुरू असलेल्या मॅकॅनिकल स्विपिंगच्या कामाशी तौलानिक अभ्यास तसेच रोजंदारीच्या दरातील वाढ गृहीत धरून एस्टीमेट केल्याने दर ३१६ रुपयांनी वाढला आहे  या कामाअंतर्गत सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगररस्ता, विमानतळ रस्ता, मगरपट्टा येथील रस्त्यांसारख्या मोठ्या रस्त्यांची व पदपथांची नियमीत सफाई केली जाणार असल्याचेही या अधिकार्‍यांनी नमूद केले. 

Related Articles