येरवडा-लक्ष्मीनगर परिसरात पोलिस चौकीसमोर वाहनांची तोडफोड   

नागरिकांंमध्ये भीतीचे वातावरण 

येरवडा : पुणे पोलिस परिमंडळ चारचे उपायुक्त हाताच्या अंतरावर असूनही येरवडा भागात वाहन तोडफोडीचे सत्र कायम गेल्या चार महिन्यात थांबेना. हातात धारदार शस्त्र घेऊन २४ वाहनांची तोडफोड केल्याची घटना लक्ष्मीनगर परिसरात बुधवारी रात्री घडली. 
 
पुणे शहरात बिबेवाडी, फरासखाना या भागात गेल्या चार दिवसांत दहशत माजविणे आणि  हुल्लडबाजीसाठी वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असताना येरवडा परिसरातही पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यार्‍यांनी डोके वर काढले आहे. येरवडा पोलिस आणि पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांचा धाकच राहिला नसल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या काही सदस्यांनी म्हटले आहे.  येरवडा सह परिमंडळ चारच्या हद्दीत टवाळखोरासंह हुल्लडबाजी करणार्‍यांची संख्या अधिक वाढली आहे. या गुंडप्रवृत्तीच्या तरूणांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. परंतु प्रशासनच याकडे दुर्लक्ष करत आहे. 
 
पोलिस कर्मचारी आणि अधिकारी आरोपांना सोडून सामान्य व्यक्तीवर दादागिरी करत असल्याचे समोर आले आहे. अन्यायला वाचा फोडणार्‍यावर गुन्हा दाखल केल्याची घटना विश्रांतवाडी हद्दीत घडली आहे.पोलिसांनी गुन्हेगारांविरुध्द आक्रमक पवित्रा घेण्याची गरज आहे. तसेच  गुन्हेगार वठणीवर येत नसल्याने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.  वाहन तोडफोडीच्या सत्रामुळे हातावर पोट असणार्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे.  काही वाहने ही 
 
पोलीस चौकीच्या जवळच फोडण्यात आली आहेत. यामुळे वाहनांचे नुकसान झालेच, परंतु वाहन चालक-मालक, कुटंबामध्ये या दहशतीमुळे  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवार आणि बुधवारी सलग बिबेवाडीसह फरासखाना- येरवडा भागात वाहनांची तोडफोड केली जात आहे. येरवडा परिसरात वाहन तोडफोडीच्या या प्रकरणात पाच आरोपी ताब्यात आहेत. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार तरुणांनी हातात कोयता आणि बांबू घेऊन गाड्यांची तोडफोड केली. लक्ष्मीनगर परिसरात २२ रिक्षा आणि दोन दुचाकीची तोडफोड झाली आहे. आणखी कोणाची वाहने फोडली असतील, तर त्याची माहिती घेतली जात आहे, असे पोलीस उपायुक्त  हिम्मत जाधव  सांगितले.

Related Articles